ध्वजारोहण कार्यक्रमात शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न;
येवल्याच्या प्रशासकीय संकुलात खळबळ
येवला (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यानच येवला प्रशासकीय संकुलात एका शेतकरी कुटुंबाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
येवला शहर आज जवळ असलेल्या
पारेगाव येथील शेतकरी संजय पाठे, विजय पाठे, सुलभा पाठे आणि जवाहरलाल भोसले यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या वादातून त्यांनी हे पाऊल उचलले. रस्ता खुला करूनही त्यांना तो वापरता येत नाहीये, असा त्यांचा आरोप आहे. रस्त्यावर मोठा खड्डा आणि दगड टाकण्यात आले असून, कुटुंबातील सदस्यांना ये-जा करताना त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली.
घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि संदीप मंडलिक यांनी तात्काळ धाव घेत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले. त्यानंतर तहसीलदार आबा महाजन यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ पाहणी करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, रस्त्यामुळे त्यांना शेतात काम करता येत नाहीये, ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर परिणाम होत आहे. यामुळे, निराश होऊन त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.