येवल्यात सोयाबीन-तूर आंतरपीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग
येवला: येथील जय योगेश्वर कृषी विज्ञान मंडळातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (कडधान्य योजना) सोयाबीन-तूर आंतरपीक पद्धतीचा एक अभिनव प्रयोग राबवण्यात आला आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन पिकांचे उत्पन्न मिळवणे शक्य होणार आहे, अशी माहिती हितेंद्र पगार यांनी दिली.
या योजनेंतर्गत एकूण २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली, ज्यात ४ महिला, २ मागासवर्गीय आणि १९ सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येकी एका एकराप्रमाणे एकूण १० हेक्टर क्षेत्रावर हे प्रात्यक्षिक राबवण्यात आले.
असा आहे प्रयोग:
* शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करण्यात आले आणि त्यानुसार खतांचा वापर केला गेला.
* फुले संगम वाणाचे सोयाबीन आणि BDN-716 वाणाचे तूर बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले.
* ७.५० फुटावर सोयाबीनची पेरणी केल्यानंतर तुरीची ओळ पेरण्यात आली.
* तसेच, बीजावर प्रक्रिया करणे, शेतात मृगसरी काढणे, बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, ४५व्या आणि ६०व्या दिवशी तुरीचा शेंडा खुडणे, फेरोमेन सापळे आणि स्टिकी कार्डचा वापर करणे, निंबोळी अर्क आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणे, यांसारख्या बाबींचेही प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले.
उत्तम उत्पन्न आणि कमी खर्च:
सोयाबीनचे पीक निघून गेल्यावर तुरीच्या पिकाला फुलोरा येतो. सोयाबीन काढल्यानंतर ५० दिवसांत तुरीचे पीक तयार होते. या पद्धतीमुळे शेतकऱ्याला कोणताही अतिरिक्त खर्च न करता दुहेरी उत्पन्न मिळते. सद्यस्थितीत दोन्ही पिके उत्तम प्रकारे आली असून 'क्रॉपसॅप' (Cropsap) ॲपद्वारे किडींच्या प्रादुर्भावाची नोंद घेतली जात आहे. तसेच, सर्वेक्षणानुसार शेतकरी शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शनही दिले जात आहे.
या नवीन पीक पद्धतीचा अवलंब भविष्यात इतर शेतकऱ्यांनीही करावा, असे आवाहन हितेंद्र पगार आणि येवल्याचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी केले आहे.