येवल्यातील चिरतरुण वाडे... प्रभाकर झळके सा.विवेकवरून साभार

पैठणी ही येवला गावाची ओळख. पण एवढीच काही येवला गावाची महती नाही. या गावाला एक इतिहास आहे आणि हा इतिहास जतन केला आहे इथल्या वैशिष्टयपूर्ण  वाडयांनी.  येवलेकरांच्या चिरतरुण वाड्यांची ही वेगळी ओळख. घुजीबाबा पाटील यांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी वसवलेल्या 'येवले' (जि. नाशिक) या शहराची अनेक वैशिष्टये आहेत. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुध्दाचे सेनापती तात्या टोपे यांची ही जन्मभूमी. स्वातंत्र्यपूर्व काळात कै. आपटे गुरुजी यांनी भारतातील पहिली राष्ट्रीय शाळा सुरू केली होती. स्वामी मुक्तानंद व जंगलीदास महाराजांची ही तपस्याभूमी. पैठणी व सोवळे (कद) यांच्या निर्मितीचे हे प्रमुख केंद्र. येथे दर मंगळवारी घोडयांचा बाजार भरतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा प्रथम येथेच केली होती. आशिया खंडातील पेपीनचा (पपईपासून पावडर बनविण्याचा) पहिला कारखाना येथे आहे. अशा या येवल्याचे आणखी खास वैशिष्टय म्हणजे येथे अनेक वाडे होते. जणू काही हे वाडयांचेच गाव. या वाडे संस्कृतीचे वैशिष्टय म्हणजे वाडयातील रहिवासी एकमेकांच्या सुखदु:खात लगेच सहभागी होत. आपण सारे एकाच कुटुंबातील सदस्य आहोत अशा भावनेने सारे जण एकमेकांशी वागत. पापड, शेवया, कुडर्या, लोणची करण्यास, निवडणे-पाखडणे-दळणकांडण करण्यास येथील स्त्रिया एकमेकींस सहकार्य करीत. खाद्यपदार्थांचा वानोळा एकमेकींच्या घरी मोठया आपुलकीने पाठविला जात असे. विशेषतः दिवाळीत एकमेकांना फराळाला मोठया अगत्यपूर्वक बोलविले जात असे. मुले वाडयाच्या प्रांगणात गोटया, कवडया, भोवरे, लपंडाव खेळत, तर मुली सागरगोटे, दोरीच्या उडया, भातुकली, बाहुला-बाहुलीचे लग्न, लपाछपी असे खेळ खेळून आपली करमणूक करीत. वाडयातील स्त्रिया संध्याकाळी देवदर्शनाला एकत्र जात. मराठी संस्कृतीज्या वाडयांतून वाढली, बहरली असे हे येवल्यातील वैशिष्टयपूर्ण वाडे पुढीलप्रमाणे.
बालाजीचा वाडा
या वाडयात बालाजीचे भव्य मंदिर आजही आहे. या वाडयाला भव्य प्रवेशद्वार व चारही बाजूने दगडी कोट व चार टोकांना बुरूज होते. आज या वाडयाचे भव्य द्वार, दर्शनी भिंत व एक बुरूज साक्षीला आहे. या वाडयात तीन आड आहेत. त्यांना वर्षभर पाणी असते. त्याचा उपयोग वाडयातील रहिवाशांना होत असे. या वाडयात बालाजीचे 3/4 पुजारी व इतर 5/6 भाडेकरू राहत होते. आज एक पुजारी व 3/4 भाडेकरू वास्तव्य करून आहेत.
विनय मंदिर वाडा
कै. आपटे गुरुजींनी पारतंत्र्याच्या काळात भारतातील पहिली शाळा ज्या वाडयात सुरू केली होती तो विनय मंदिर नावाचा वाडा आजही साक्ष म्हणून तीन देवळाजवळ उभा आहे. इंग्रजांनी ही शाळा उद्ध्वस्त करून आपटे गुरुजींना नाशिकच्या तुरुंगात डांबून ठेवले होते. वाडयाच्या मध्यभागी जाण्या-येण्याचा छोटा मार्ग व दोन्ही बाजूस दोन मजली घरे आहेत. आज या वाडयात 10/12 रहिवासी आहेत. त्या सर्वांनी आपले राहते घर कायमचे विकत घेऊन टाकले आहे.
दाणी वाडा
विनय मंदिर या वाडयाच्या शेजारी कै. शां. गो. दाणी (वकिल) यांचा 'दाणी वाडा' म्हणून प्रसिध्द होता. ते स्वत: येथे राहात होतेच. शिवाय या वाडयात 7/8 भाडेकरू होते. आपल्या राहत्या घरासह हा वाडा त्यांनी विकला असून तेथे आज मोठी इमारत उभी राहात आहे.
कानळसकरांचा वाडा
दाणी वाडयाच्या समोरच कानळसकरांचा दोन मजली वाडा असून मध्यभागी चौक आहे. तेथे 10/12 भाडेकरू होते.
बर्वेवाडा
भालदार गल्लीच्या कोपऱ्यावर हा वाडा आहे. बर्वे यांचे घराणे श्रीमंत होते. ते स्वत: तेथे राहत होते. या वाडयाला देखील भोवताली भिंत व बुरूज होते. त्यापैकी एक भिंत व एक बुरूज आजही उभा आहे. बर्वे यांनी हा वाडा विकल्यावर तेथे काही भाडेकरू राहू लागले.
लाडवाडा
आझाद चौकाच्या थोडे पुढे गेल्यावर तेथे हा दोन मजली वाडा आहे. या वाडयात 12/15 भाडेकरू राहत होते. मालकांनी हा वाडा पाडून तेथे आज दोन मजली बांधकाम उभे केले आहे.
उंदिरवाडकरांचा वाडा
या लाड वाडयासमोरच 'उंदिरवाडकरांचा वाडा' होता. याचे प्रवेशद्वार बरेच मोठे होते. बाह्य बाजूस एक मजली व आतील बाजूस दोन मजली बांधकाम होते. यापुढे बरीच मोठी मोकळी जागा होती. येथेही भाडेकरू राहत होते. आज हा संपूर्ण वाडा पाडून नवीन बांधकाम चालू आहे.
सूतवाल्यांचा वाडा
ऋग्वेदी कार्यालयाच्या बाजूला हा वाडा होता. श्रीमंत बाळासाहेब कुलकर्णीयांच्या मालकीचा हा वाडा. त्यांचा सूत खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, म्हणून त्यास सूतवाल्यांचा वाडा असे संबोधले जात असे. या वाडयाच्या मालकासह 10/12  भाडेकरू राहत होते. हा वाडा विकला जाऊन आज तेथे भव्य इमारत उभी आहे.
गुजरवाडा
शहराचे पूर्वेकडील टोकाला हा वाडा आहे. या वाडयाचे प्रवेशद्वार व दर्शनी भिंत आज उभी आहे. या वाडयात आठदहा भाडेकरू होते. आजही येथे 5/6 भाडेकरू राहात आहेत. बहुसंख्य लोक गुजर समाजाचे, म्हणून त्यास गुजरवाडा हे नाव पडले.
कवठीचा वाडा
या वाडयाजवळ कवठाचे झाड होते, त्यावरून या वाडयास कवठीचा वाडा असे संबोधले जात होते. या वाडयात समोरासमोर एक मजली सुमारे 8/10 घरे आहेत.
पाटीलवाडा
येवल्याचे संस्थापक रघुजीबाबा पाटील यांची गढी (राहण्याचे ठिकाणी) म्हणून ओळखली जाते, त्याच्या बाजूलाच हा वाडा आहे. रघुजीबाबा पाटील यांच्याशी संबंधित असलेले बहुसंख्य लोक तेथे राहात होते. आज तेथे 4-6 भाडेकरू आहेत.
साळीवाडा
'मोठे महादेवाचे मंदिर' समोरून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हा वाडा आहे. येथील घरे एकमजली असून 5-6 भाडेकरू येथे राहतात.
जोगवाडा
खत्री गल्लीत हा वाडा आहे. तीन बाजूंनी घर व मध्ये बरीच मोठी जागा आहे. येथे 12/13 घरे असून ती बहुतेकांची स्वत:च्या मालकीची आहेत.
लचकेवाडा
शिंपी गल्लीत हा वाडा आहे. दर्शनी भिंत दगडी असून प्रवेशद्वार मोठे आहे. हा वाडा दुमजली असून आत लचके यांच्या संबंधित असलेले लोकच रहातात.
महाजनवाडा
टिळक मैदानावर अती भव्य व लाकडावरील देखणी, सुंदर, आकर्षक कलाकुसर असलेला असा 'महाजन वाडा' होता. या वाडयाच्या चारही बाजूच्या भिंती दगड व विटांनी बांधलेल्या होत्या. या वाडयात महाजन आडनाव असलेले श्रीमंत गृहस्थ आपल्या कुटुंबीयांसमवेत राहात होते. हा वाडा काही दिवसांपूर्वी विकला जाऊन तेथे सिमेंटची तीन मजली इमारत उभी राहिली आहे.
अशा प्रकारे एक प्रकारची आपुलकीची, एकमेकांना सहकार्य करणारी, एकमेकांबद्दल प्रेम व आदर असणारी संस्कृती ज्या वाडयांमध्ये नांदत होती, त्या वाडयांबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.
सध्या फ्लॅट व दरवाजा बंद संस्कृती आली आहे. मी व माझे कुटुंबीय या मर्यादेतच माणूस वागत असलेला पाहून आमची वाडे संस्कृती किती श्रेष्ठ आहे या नुसत्या आठवणीने छाती फुगून येते. आता एवढेच म्हणावेसे वाटते, 'कालाय तस्मै नम:!'

थोडे नवीन जरा जुने