नाशिकचे खासदार समिर भुजबळ यांचा शोकसंदेश................

खा. समीर भुजबळ यांचा शोकसंदेश
केंद्रीय मंत्री आणि माझे संसदेतील जेष्ठ सहकारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख  यांचे निधन ही एक मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना स्वकर्तुत्वाने साकारलेला सरपंच ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
माझ्या राजकीय कारकीर्दीच्या प्रवेशात विलासरावांचाही निश्चितपणे वाटा आहे. मी लोकसभेची उमेदवारी करण्यास सक्षम आहे असे विलासरावांनी सांगितल्यानंतर पवार साहेबांनी माझी उमेदवारी निश्चित केली. ते केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री असताना नाशिक मध्ये भेल सारखा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा उपक्रम सुरु करण्यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर त्यांनी नाशिक ला ऑटो पार्क आणण्याचे मला सांगितले होते. सतत हसत खेळत असणारे आणि सर्व क्षेत्राचा गाढा अभ्यास असणारे ते व्यक्तिमत्व होते. वकिलीचा त्यांचा मूळ पेशा असल्याने एखाद्या कामासाठी किती वेळ लागला पाहिजे याचे त्यांना सतत भान असे. जस्टीस डीलेड, इज जस्टीस डीनाइडअसे ते नेहमी सांगायचे.    
मैदानी वक्ता असलेले विलासरावांची बोलण्याची लकब, हजरजबाबीपणा आणि भाषणाच्या मध्ये-मध्ये प्रासंगिक विनोदाची पेरणी, कोपरखळ्या मारत आपल्या खुसखुशीत वक्तव्यानं श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात विलासराव नेहमी यशस्वी होत. राजकारणात असूनही कला, क्रिडा, संगीत, साहित्य या विषयांचे ते चाहते होते. सिनेमाचे ते शौकीन आणि जाणकार होते.
२००३ मध्ये सरकारवर अविश्वास ठरावाचा आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेस विलासरावांनी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांनी  सतत संपर्कात राहून ज्या प्रकारे यंत्रणा राबवली आणि सरकार वाचविले त्या प्रसंगात विलासरावांचे नेतृत्वाचे गुण प्रकर्षाने लक्षात आले. एक अत्यंत उमद्या मनाचा आणि अजातशत्रू नेत्या ला आपण मुकलो आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देओ हीच प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने