पाटोदा येथे द्राक्षमणी लिलावाचा प्रारंभ

येवला - येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पाटोदा येथील आवारात द्राक्षमणी खरेदीचा शुभारंभ नुकताच उपबाजार समितीचे सभापती अशोकराव मेंगाणे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. पाटोदा उपबाजारात द्राक्षमण्यांची एकूण आवक 50 कॅरेट झाली. द्राक्षमण्यास बाजारभाव 12 ते 21 रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळाले. उपबाजार पाटोदा येथे द्राक्षमणी खरेदी सुरू झाल्यामुळे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना जवळच्या ठिकाणी द्राक्षमणी विक्रीची चांगली सोय निर्माण झाली आहे. तसेच सदर मालाचे रोख पेमेंट मिळणार आहे.

शिवार खरेदीतून होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. उपबाजार पाटोदा येथे दररोज सायंकाळी 5 वाजता द्राक्षमणी लिलाव होणार असल्याने पाटोदा व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांनी आपले द्राक्षमणी उपबाजारात स्वच्छ करून विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी केले आहे. तसेच व्यापार्‍यांनी द्राक्षमण्यांची शिवार खरेदी करू नये, शिवार खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर बाजार समितीमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती देवीदास शेळके, रतन पा. काळे, देवीदास निकम, सचिव डी. सी. खैरनार, कोषपाल संजय ठोक व बाजार समितीचे कर्मचारी, तसेच शेतकरी भगवंत ठोंबरे, प्रकाश भवर, राजू कव्हात, मच्छिंद्र धनवटे, नितीन शेळके, मधुकर देशमुख व व्यापारी साजिद पठाण, राजूभाई शेख, अमीनभाई नाईकवाडी, सुलेभान चौधरी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने