राजापूरवासीयांचा गुरुवारी रास्ता रोको

राजापूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी आटल्याने राजापूरवासीयांचा पाणी प्रश्न बिकट बनला असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 24) रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राजापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी येथून जवळच असलेल्या लोहशिंगवे शिवाराजवळ खैराबाई पाझर तलावाच्या खालच्या बाजूस खोदलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीचे पाणी कमी झाले आहे. या विहिरीलगत एका शेतकर्‍याने विनापरवाना खासगी कूपनलिका खोदल्यामुळे विहिरीचे पाणी आटल्याची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख, तसेच ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी वाढावे, यासाठी विहिरीजवळ कूपनलिका खोदण्यासाठी ग्रामपंचायतीने बोअरवेलची गाडी बोलावली असता सदर शेतकर्‍याने हरकत घेऊन ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना खीळ घातली. याबाबत ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत योग्य कार्यवाही होऊन राजापूरकरांचा पाणीप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड, अशोक मुंढे, सखाराम मुंढे, खंडू भोरकडे, अनिल घुगे, राधाकिसन वाघ, भागीनाथ वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
थोडे नवीन जरा जुने