येवला - तालुक्यातील ग्रामस्तर प्रत्येक गावात आधार कार्ड नोंदणी
केंद्र सुरू करावे, कामगारांना मोफत धान्य वाटप करावे, शेतकर्यांची कर्जे
माफ करावीत, नियमित पाणीपुरवठा व्हावा, शेतकर्यांची पिककर्जे माफ व्हावी,
नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी आदी
मागण्यांचे निवेदन येवला तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने
तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, आधार कार्ड केंद्र केवळ शहराच्या ठिकाणी असल्याने ग्रामीण जनतेला आधार कार्ड काढण्यासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते. प्रत्येक शासकीय कामासाठी शासनाने आधार कार्डचा पुरावा महत्त्वाचा मानला जात असल्याने आधार कार्ड काढणे प्रत्येक नागरिकास गरजेचे बनले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रा.पं. कार्यालय अथवा प्राथमिक शाळेत आधार कार्ड नोंदणी केंद्र स्थापन करण्यात यावे, तसेच बांधकाम कामगारांवर पाणीटंचाईमुळे बेकारीची वेळ आल्याने नोंदणी झालेल्या कामगारांना कल्याणकारी मंडळात गहू, तांदूळ आदी मोफत वाटप करण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याने टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा, येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असल्याने शेतकर्यांची पिककर्जे माफ करण्यात यावी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके पाण्याअभावी करपल्याने प्रत्येक गावात करपलेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी आदी समस्यांचा गांभीर्याने विचार करून शासनस्तरावरून तात्काळ अंमलबजावणी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अध्यक्ष रणजित संसारे, सचिव सखाराम खळे, गोरख सुरासे, आमिन शेख, हिरालाल घुगे, बाळू खैरनार, नाना पिंगळे, बाळू गुंजाळ आदींच्या स्वाक्षर्या आहेत. |