जऊळके येथे तीव्र पाणीटंचाई

येवला तालुक्यातील जऊळके येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास जलकुंभाजवळ ताटकळत उभे रहावे लागते.अडीच हजार लोकसंख्या असणार्‍या जऊळके येथे जलस्वराज्य अभियानअंतर्गत पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत. सदर योजनेअंतर्गत सात वर्षांपूर्वी विहीर व जलकुंभाचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. मात्र खोदलेल्या सदर विहिरीला तेव्हापासून पाणीच नाही. गावात दोन हातपंप असून, यापैकी एक अडीच वर्षांपासून तर दुसरा दीड महिन्यांपासून पाण्याचा उद्भव नसल्याने बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायतीने पंचवीस वर्षांपूर्वी खोदलेल्या एका कूपनलिकेवरच गावातील जलकुंभ भरला जातो. मात्र या कूपनलिकेचेही पाणी कमी पडल्याने गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यात वीज भारनियमनाची मोठी भर पडत असून, परिणामी जलकुंभावर हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासन्तास रांगा लावून ताटकळत बसावे लागते. गावात गावतळेही झाले असून, पालखेड पाणी आवर्तनात सदर बंधारा भरला गेला असता तर पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या असत्या मात्र पाणी आवर्तन मिळालेच नाही.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जऊळके येथील पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पालखेड पाणी आवर्तनातून जऊळके येथील बंधारा तत्काळ भरून मिळावा, अशी मागणी सरपंच मल्हारी दराडे यांनी केली आहे.
थोडे नवीन जरा जुने