साईभंडार्‍यात सुमारे १५ हजार साईभक्तांचा सहभाग मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रोषणाईने मंदिर उजळले

येवला  - शहरातील श्री साईनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य साई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित साईभंडार्‍यास १५ हजार साईभक्तांनी सहभाग नोंदवत साईंवरील अपार प्रेमाची मायाच प्रकट केली. काबरा परिवाराच्या वतीने संगीता काबरा यांनी चांदीच्या पादुका यावेळी अर्पण केल्या. शिर्डी येथील साई मूर्तीसारखीच हुबेहूब मार्बलची नवीन मूर्ती मंदिरात स्थानापन्न करण्यात आली.
दोन दिवस चालला सोहळा
प्रथम वर्धापनदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तर गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी भल्या पहाटे मिलिंद शिंदे व किरण शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक साईंना अभिषेक करण्यात आला. यावेळी पौरोहित पराग पाटील यांनी केले. निवृत्ती महाराज चव्हाण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येकाच्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आईमुळेच मातृत्व जन्माला आले. म्हणूनच आईनंतर साईंची पूजा प्रत्येकाने केली पाहिजे. ‘आ’ म्हणजे आत्मा अन् ‘ई’ म्हणजे ईश्‍वर आणि साई म्हणजे साक्षात ईश्‍वररूप, ईश्‍वरीय अवताराचा जन्म असेही यावेळी निवृत्ती महाराज चव्हाण यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले.
येवल्यात अवतरली ‘शिर्डी’
साईभंडार्‍यानिमित्ताने जणू काही येवल्यात ‘शिर्डी’ अवतरल्याचा भास होत होता. १५ हजार साईभक्तांची हजेरी, साईंच्या जयजयकाराने संपूर्ण आसमंतच दुमदुमला होता. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, जिल्हा बँक संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, बिपीन कोल्हे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक सुनील काबरा यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली. कीर्तनाच्या समारोपानंतर साईभंडार्‍याचा कार्यक्रम संपन्न झाला. ट्रस्टचे अध्यक्ष महेश काबरा, साईभंडारा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गवळी, उपाध्यक्ष बंटी धसे, ट्रस्टचे उपाध्यक्ष नंदकुमार दाणेज, किरण शिंदे, विनायक ठाकूर, प्रमोद खेरूड, लक्ष्मण सुकासे, भूषण संत, सुनील लक्कडकोट, भाऊ वडे, दीपक बूब, दत्ता साळी, लाला ठाकूर, राजेंद्र शिंदे आदींसह ४०० स्वयंसेवक सेवेसाठी सज्ज होते. भाविकांचा जल्लोष, साईंवरील अपार प्रेमाने परिसर साईमय झाला होता.
थोडे नवीन जरा जुने