संवाद हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम जयकर व्याख्यानमाला

येवला - संवाद हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. जीवनात आपण दररोज संवाद साधतो. संवाद कौशल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप दुसर्‍यावर पाडता येते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात संवादाला खूप महत्त्व असते असे प्रतिपादन नाशिक येथील एम.बी.ए. महाविद्यालयाचे प्रा. प्रसाद जोशी यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर, मालेगाव कॅम्प संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पुणे विद्यापीठ बहि:शाला शिक्षण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. प्रसाद जोशी यांनी गुंफले. ‘संवाद कौशल्य काळाची गरज’ या विषयावर बोलताना प्रा. प्रसाद जोशी म्हणाले, परिणामकारक संवाद हा नेहमी माणसे जोडण्यासाठी उपयोगी पडतो. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही संवादाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संवादाचे कौशल्य प्राप्त केले पाहिजे. व्यक्तीच्या अंगी हुशारीबरोबरच संवाद वैशिष्ट्यपूर्ण साधण्याची कला पाहिजे असेही प्रा. प्रसाद जोशी यावेळी म्हणाले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. भाऊसाहेब गले होते होते. प्रा. टी. एस. सांगळे यांनी प्रस्ताविक केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रकाश वानखेडे यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे यांनी मानले.
व्याख्यानमालेच्या दुसर्‍या पुष्पात रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी सप्रयोगाद्वारे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर मत मांडले. डॉ. घोडेराव यांनी वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करून करदोड्याचा रंग बदलणे, लिंबातून रक्त येणे, पाण्याचा दिवा पेटविणे, वस्तूचे वजन छोट्या लाकडाने पेलणे, हातातून पैशाच्या नोटा काढणे असे प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून दाखविले. अंधश्रद्ध लोक या प्रयोगांना खरे मानतात व बुवाबाजीच्या आहारी कसे जातात यावर बोलताना प्रा. डॉ. सुदेश घोडेराव म्हणाले, आज समाजजीवन गतीने बदलत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भानामती, मूठ मारणे, अंगात येणे या गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन घोडेराव यांनी केले. विज्ञानयुगात प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारणभाव आपण समजावून घेतला पाहिजे असेही घोडेराव यावेळी म्हणाले. तिसरे पुष्प पंचवटी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी गुंफले. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
 

थोडे नवीन जरा जुने