लौकीशिरसला धान्य दुकानदाराविरोधात तक्रारींचा पाऊस

लौकीशिरस येथील तेजस्वी महिला बचतगटाच्या ताब्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहे. बचतगटाच्या महिलांनी गावातील ग्रामस्थांविरोधात जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीचे गुन्हे दाखल केल्याने तणावात भर पडली आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तहसीलदारांना शिधापत्रिका वळदगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडण्याचे लेखी आदेश दिले आहेत. 
सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या वळदगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा ताबा तेजस्वी महिला बचतगटाकडे अनेक वर्षांपासून आहे. सुमारे 250 शिधापत्रिकांचे शिधा वाटपाचे अधिकार या दुकानदारांकडे आहे. गेल्या चार वर्षांपासून गावातील कुटुंबीयांना कधीच वेळेवर शिधा मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केल्या आहेत. मात्र, तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून तक्रारदार ग्रामस्थांना कधीच न्याय मिळाला नाही. स्वस्त धान्य दुकान चालविणार्‍या बचतगटाच्या महिलांकडून गावातील ग्रामस्थांसह महिलांनाही दरमहा शिधा मिळविताना अरेरावी व दमबाजी केली जात असल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी दाखल केल्या असून, तहसीलदारांना मागणीनुसार या गावातील कुटुंबीयांच्या शिधापत्रिका वैयक्तिकरीत्या वळदगाव येथील दुकानाला जोडण्याच्या सूचना पुरवठा अधिकार्‍यांना 5 जुलै रोजी दिल्या आहे. गावातील 150 शिधापत्रिका आजपावेतो जोडण्याची कार्यवाही झाली असून, उर्वरित शिधापत्रिकाधारकांना मात्र या महिलांकडून अडवणूक केली जात आहे. स्वस्त धान्य दुकान चालविणार्‍या दोघा महिलांमधील एका महिलेने 17 जुलै रोजी पाच जणांविरोधात जातिवाचक शिवीगाळ व छेडछाड केल्याचा व 21 जुलै रोजी मारहाण केल्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. सरपंच, उपसरपंच यासह विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, तंटामुक्तीचे अध्यक्ष आदींसह ग्रामस्थांनी गावात कुठलाही प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. 
थोडे नवीन जरा जुने