सेनापती तात्या टोपे नियोजित स्मारकासाठी येवल्यातील शिष्टमंडळाची ना. नितीन गडकरीशी भेट...


सेनापती तात्या टोपे नियोजित स्मारकासाठी येवल्यातील शिष्टमंडळाची ना. नितीन गडकरीशी भेट...

येवला : 
येवल्याचे भूमिपुत्र आणि 1857 च्या स्वतंत्र समराचे सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे यामागणीसाठी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथील परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री ना. नितीन गडकरी यांची दुसऱ्यांदा दिल्ली येथे  भेट घेऊन सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यातील स्मारक पालखेड विभागाच्या जागेतच व्हावे अशी आग्रही मागणी केली. ना. गडकरी यांनी सबंधित विभागाला जागा बदलाच्या सूचना केल्या. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या जागेतच स्मारक होण्याचा कामाला अधिक गती मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहे.  
येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडे दहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावा जवळील जागेवर हे स्मारक व्हावे असा ठराव पालिकेने केला आहे. परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा गैरसोयीची व अडगळीची असल्याने, हे स्मारक  नासिक-औरंगाबाद महामार्गावरील अंगणगाव शिवारातील स. न.15, 16, 19, मधील 3 हेक्टर 35 आर या शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागी व्हावे अशी मागणी सातत्याने होत आहे.  
नासिक-औरंगाबाद महामार्गावरील पाटबंधारे विभागाच्या जागेवर हे नियोजित स्मारक व्हावे यासाठी मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नासिक यांनी तयारी दाखवत पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या सूचनेने दर्शविली. व यासंबधीचा प्रस्ताव कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांचेकडे अहवाल व नकाशासह तत्काळ पाठवला आहे. परंतु सुमारे 4 ते 5 एकर जागेची गरज असल्याने स्मारकाचा विषय प्रलंबित आहे. दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, भाजप नेते संजय सोमासे, श्रीकांत खंदारे यांच्या शिष्ट मंडळाने थेट दिल्लीत ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली. थेट चर्चेत गडकरी यांनी सेनापतीच्या स्मारकाबाबतचा आढावा घेतला. व हे स्मारक येवला नाशिक रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या जागेवर होण्यासाठी संबधित विभागाला शिफारस केली. 
नासिक - औरंगाबाद महामार्गावरील जागा कशी योग्य आहे. याबाबत समिती अध्यक्ष आनंद शिंदे यांनी बाजू मांडतांना साठवण तलावाजवळील  नियोजित स्मारकाची जागा अत्यंत गैरसोयीची आहे ही बदलावी अशी येवला शहर वासीयांची अंतर्मनातील भावना असल्याचे सांगितले. यावेळी ना. नितीन गडकरी यांचा येवल्याचा फेटा बांधून शिष्ट मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
============================================
फोटो कॅप्शन 
सेनापती तात्या टोपे नियोजित स्मारक योग्य जागी व्हावे,यासाठी नामदार नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट प्रसंगी चर्चा करताना खासदार हरिशचंद्र चव्हाण, आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, संजय सोमासे, स्विय्य सहाय्यक डॉ.संदिप पवार आदि. 
 

 




 

थोडे नवीन जरा जुने