येवल्यातील शिष्टमंडळाची ना. नितीन गडकरीशी भेट... तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
येवल्यातील शिष्टमंडळाची ना. नितीन गडकरीशी भेट...
तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी 
 
येवला : प्रतिनिधी
मांजरपाडा प्रकल्प नंबर 1 हा दिंडोरी, वणी, चांदवड, येवला तर काही निफाड व वैजापूरला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा असला तरी केवळ पूर पाणी आले तरच हे शक्य असल्याने मांजरपाडा केवळ मृगजळ ठरू नये यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोरे मधील नार पार प्रकल्पातून येवला तालुक्यातील सिंचनासाठी पाणी आरक्षित करावे व उपेक्षित असलेल्या येवला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढावा अशा मागणीचे निवेदन येवल्यातील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री ना. नितीन गडकरी यांना दिले. याबाबत अभ्यास करून येवला तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. 
सोमवार 4 सप्टेबर रोजी दिल्ली येथील परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, संजय सोमासे, श्रीकांत खंदारे यांच्या शिष्टमंडळाने ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. व याबाबत चर्चा केली. मांजरपाडा प्रकल्पातील पुरपाण्याचा फायदा येवला तालुक्याला होणार असला तरी विशेष पाणी आरक्षण नसल्याने निसर्गाच्या भरवश्यावर तालुक्यातील सिंचन व्यवस्था आहे.  पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि सिंचनासाठी असणारे पाणी यामध्ये अधिकाऱ्याचे हात ओले कसे होतात. ही वस्तुस्थिती शिष्टमंडळाने ना. गडकरी यांच्यासमोर मांडली आणि येवला तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्याअंतर्गत नार पार प्रकल्पातील पाणी आरक्षित करून येवला तालुक्याच्या अंतिम सीमेपर्यंत खात्रीचे पाणी द्यावे यासाठी आपण शिष्टाई करावी असा आग्रह येवल्याच्या शिष्टमंडळाने ना. गडकरी यांच्याकडे धरला. येवल्याची सिंचनाची परिस्थिती जाणून घेत ओलिताखाली अधिक क्षेत्र कसे येईल याबाबत अभ्यास करून हा प्रश्न हाताळला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. 
 
-
 

 

थोडे नवीन जरा जुने