ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लौकी गावाचा बहिष्कार एकाही उमेदवाराने दाखल केला नाही उमेदवारी अर्ज

 ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लौकी गावाचा बहिष्कार
एकाही उमेदवाराने दाखल केला नाही उमेदवारी अर्ज

येवला : प्रतिनिधी 
 तालुक्यातील शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचयातीतून लौकी ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यात यावी यासंदर्भातील लौकी गावाचा विभाजनाचा प्रस्ताव  शासन दरबारी प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतिची मुदत संपल्याने निवडणुकिचा कार्यक्रम जाहीर केला.मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत असतांना एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल न करता लौकी गावाने या निवडणुकीवर सामुदायिकरित्या बहिष्कार टाकला असून २६ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानावरही बहिष्काराचा निर्णय गावाने घेतला आहे.
शिरसगाव ग्रुप ग्रामपंचायतीत शिरासगवसह लौकी आणि वळदगाव या तीन गावांचा समावेश आहे.ग्रुप ग्रामपंचायतीतून लौकी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी पंचायत समितीकडे भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुर्हे यांनी १४ एप्रिल २०१७ रोजी सादर केला होता.६ मार्च २०१८ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ग्रामविकास खात्याकडे सदरचा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला .लौकी ग्रामपंचायत स्वतंत्र स्थापन करण्यासंदर्भात ४ जून २०१८ रोजी वित्त विभागाकडे कार्यवाहीसाठी सादर झाला.मात्र ८ डिसेंम्बर २०१८ रोजी ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाने तीन महिने अगोदरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.यामुळे गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.परंतु निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत होती . गावाने एकी दाखवत एकही उमेदवाराचा अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे या गावातील तिन्ही जागा रिक्त राहणार आहेत.ग्रुप ग्रामपंचायतीत लौकी गावातील एक वार्डाचा समावेश असून तीन सदस्य निवडून येतात. गावात १ हजार २२ मतदार आहेत. लौकी गावाची ग्रामपंचायत जोपावेतो स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय  ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुर्हे यांनी दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने