येवला तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा.... संभाजीराजे पवार

 येवला तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा.... संभाजीराजे पवारयेवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यात 23 गावे आणि 19 वाड्यांना तब्बल 15 टँकरद्वारे उन्हाळ्यापासून पावसाळ्यात देखील चालू असलेला पाणीपुरवठा आजतागायत चालू आहे. यापेक्षा दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणते प्रमाणपत्र आणि निकष शासनाला लागतात. असा सवाल करून आठ दिवसात पिक कापणी अहवालासह औपचारिकता पूर्ण करून शासनाने येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर तालुक्यातील शेतकऱ्यासह प्रचंड मोर्चा काढून शासनाला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पडू असा इशारा शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी दिला आहे. तसेच सोमवार 29 ऑक्टोबर रोजी येवला तहसील कार्यालयावर शिवसैनिकासह शेतकरी बांधवासह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.     
येवला शहरात शासनाच्या मापदंडानुसार पाऊस झाला असेल, तीच पर्जन्यमापकाची फुटपट्टी ग्रामीण भागाला लाऊन येवला तालुक्यात सुकाळ असल्याचे चित्र शासनाकडे पोहचले. येवला तालुका दुष्काळी असल्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार मंत्री प्रा.ना. राम शिंदे यांना पाहणी करण्यासाठी सांगितले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यात व्यस्त असलेल्या राम शिंदे यांना येवला तालुक्याची पाहणी करण्यासाठी  अद्याप वेळ मिळालाच नाही.  याशिवाय तालुक्याचा पिक कापणी अहवाल देखील शासनापर्यंत पोहचला नाही. दरम्यान शासनाची दुष्काळग्रस्त तालुक्यासंदर्भाची यादी जाहीर झाली यात येवला तालुक्याचा समावेश नाही. मात्र येवला तालुक्याची सातत्याने होणारी दिशाभूल कदापि खपवून घेतली जाणार नाही. 
दुष्काळ तीव्रता भयानक आहे कि तालुक्यातील गावांना पावसाळ्यात देखील टॅकर द्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. हातची पिके पाण्याअभावी वाया गेली आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विहीरीना नविन पाणी उतरले नाही. पावसाअभावी रब्बी हंगाम 80 % वाया गेला असुन जलस्रोताचे साठे गेल्या दोन तिन वर्षा पासुन कोरडेठाक आहे. पाणीप्रश्ना बरोबर चाराप्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी व शेतमजूरावर स्थलांतराची वेळ आली आहे. येवला तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान झाले असुनही येवला तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीत नाही. त्यामुळे शेतकरी व जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यामागणीचा प्राधान्याने विचार करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी पत्रकात केली आहे. 
    
 

 
 
 

थोडे नवीन जरा जुने