प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलाचे कोटमगाव येथे उसळला वारकऱ्यांचा जनसागर



प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलाचे कोटमगाव येथे उसळला वारकऱ्यांचा जनसागर

येवला | दि. १० प्रतिनिधी
दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा वारकर्‍यांच्या दिंड्या कोटमगावात आल्या अन पांडूरंगाच्या दर्शनाने धन्य झाल्या. टाळ मृदुगांच्या गजरासह विठोबा-रखुमाई अशा सुरेल अभंगांच्या साथीने  येवला शहरापासून ३ किमी अंतरावर प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या कोटमगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभरात लाखो भाविकांनी हजेरी लावली. तालुक्यासह आसपासच्या परिसरातून दोनशेहून अधिक दिंड्याही येथे आल्या होत्या. कोटमगावकडे जाणारे चारही बाजुचे रस्ते या दिंडीमुळे फुलुन गेले होते.
सलग दोन वर्ष करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने देशभरातील सर्वच देवालये, पर्यठन स्थळे बंद करुन ठेवले होते. मात्र यंदा करोनाचे मळभ दूर झाल्याने देवालये खुली झाले, अन रात्रभर व दिवसाही पावसाची रिपरीप सुरु असताना पांडूरंगाच्या भेटीच्या ओढीने अनेक दिंड्या वारकरी कोटमगावात आले. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा  कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात पहाटे पाच वाजता नाशिकचे ऍड. उत्तम वाळूंज व येवल्याचे श्री. प्रशांत खांबेकर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटेपासून तर दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शहरातून तसेच कोपरगाव, वैजापूर, मुखेड, पाटोदा, राजापूर, अंदरसूल, पुरणगाव व तालुक्यातील तब्बल २११ हून अधिक दिंड्या दिवसभरात येथे आल्या. यातील काही दिंड्या गावाच्या जवळ असर्‍याने मुक्कामी होत्या. शेजारील तीनही तालुक्यांतील भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी सुरु होती.
विठ्ठलाचे कोटमगाव हे प्रति पंढरपुर समजले जाते. देव द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता. अशी आख्यायिका आहे. विठ्ठलाच्या सर्व मुर्त्या दोनही हात कंबरेवर असलेल्या आहेत. मात्र कोटमगाव येथील मुर्ती डावा हात  कंबरेवर तर उजवा हात खाली आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी वारकर्‍यांच्या दिंडीसह हजारो वारकरी विठ्ठलाच्या आगळ्या वेगळ्या रुपाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. आज दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने विठ्ठल भक्तांनी चिंब होत दर्शन घेत विठूरायाला समाधानकारक पावसासाठी साकडे घातले. कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथा कोटमे, सरपंच सोनाली कोटमे, विश्‍वस्त तुळशिराम कोटमे, लंकाबाई कोटमे, गणपत ढमाले, सचिन ढमाले, सुनील कोटमे, किशोर कोट्मे, जयवंत कोटमे, तुळशीराम कोटमे, सोपान ढमाले, गोविंद कोटमें, नानापाटील कोटमे, विजय कोटमे, यांनी संयोजन केले. विठ्ठलमंदिर ट्रस्ट व पोलिस निरिक्षक भगवान मथुरे, चंद्रकांत निर्मळ, व त्यांच्या चमूने यात्रेचे संयोजन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रकाश वाघ, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, सचिन कळमकर, सरपंच सोनाली कोटमे  उपस्थित होते. यावेळी ट्रस्ट व ग्रामपंचायतीने परिसर मोकळा करून जागा उपलब्ध केल्याने ३०० वर दुकाने मांडले होते. शिवनेरी ग्रुपसह दिवसभर गावातील प्रत्येक घरातून  वारकर्‍यांना व दिंड्याना फराळ देण्यात आले. पन्नासपेक्षा अधिक तरुणांनी पुढाकार घेऊन भाविकांना चहा, फराळाचे दिवसभर वाटप केले.
दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हाभर प्रसिद्ध असलेले प्रतिपंढरपूर कोटमगाव येथे निघालेल्या तालुक्यातील नेऊरगाव, एरंडगाव, मुखेड येथील दिंड्यांचे स्वागत जेष्ठ सहकार नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, नगरसेवक प्रविण बनकर, प्रगतीशील शेतकरी भास्करराव बनकर यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सर्व भाविकांसाठी बनकर पाटील परिवारातर्फे फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.
दोनवर्षाच्या प्रतिक्षेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त करीत पुन्हा देवाला कोंडून घ्यावे लागेल असे दिवस दिसू नये, व चांगला पाउस व्हावा यासाठी पांडूरंगाला साकडे घातले.

दिंड्यांना ठिकठिकाणी फराळ वाटप
तालुक्याच्या चारही बाजुंनी कोटमगावच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या दिंड्यांचे शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करुन चहा, फराळ, पाणी वाटप करण्यात आले. कोटमगाव येथील युवकांच्या वतीने मंदिरा समोरच चहा, केळी यांचे वाटप करण्यात आले. तर कोटमगाव देवीचे येथे येवला व्यापारी महासंघांच्या वतीने चार क्विंटल शाबुदान्याची खिचडी वाटप करण्यात आली. तालुक्याच्या पश्‍चिम दिशेने येणार्‍या दिंड्यांसाठी शहरातील आयोध्या नगरी येथे जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर व बनकर कुटूंबाकडून शाबुदाना खिचडी, केळी, पाणी वाटप करण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने