येवला तालुक्यात करोना रुग्ण संख्येत वाढ एकाच दिवशी १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह नागरिकांमध्ये चिंता

येवला तालुक्यात करोना रुग्ण संख्येत वाढ
एकाच दिवशी १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह नागरिकांमध्ये चिंता
येवला  : पुढारी वृत्तसेवा

येवला शहर व तालुक्यात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले असून रविवारी (१०जुलै) रोजी १३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे येवला शहरासह तालुक्यातील एकूण २१ रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे येवला शहरात ७ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण ऍक्टिव आहेत येवला तालुक्यात ६ हजार ८९८ कोरोना बाधितांची संख्या असून ६ हजार ५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ३०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तालुक्यात वाढणाऱ्या रुग्णासंख्येने नागरिकांमध्ये चिंता वाढीस लागली आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा मानली जात आहे.ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना फारसा त्रास न होता रुग्ण २ ते ३ दिवसांत बरे होत आहेत त्यामुळे उर्वरित नागरिकांनीही लस घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. येवला तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र आहे.  कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या येवला तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे, तर मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढविली आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येने तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सुध्दा सतर्क झाली आहे.
तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वेगाने प्रसार होत असल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील नागरिक गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.येवला उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुटीचे दिवस वगळता दररोज लसीकरण सुरू असून नागरिकांनी कोविड लसीकरण तात्काळ करून घ्यावे तसेच जेष्ठ नागरिकांनीही बूस्टर डोस घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
थोडे नवीन जरा जुने