शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव मदत द्यावी - छगन भुजबळ

 



शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव मदत द्यावी - छगन भुजबळ


 येवला :- पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे रस्ते उध्वस्त झाले असून शाळेच्या इमारती तसेच घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे या सर्वांना शासनाने तातडीने भरीव अशी मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.


छगन भुजबळ यांनी आज येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव व पाटोदा परिसरातील अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, कृषी अधिकारी श्री. देशपांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शिवसेना तालूकाप्रमुख रतन बोरनारे,ज्येष्ठ नेते विश्वास आहेर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, गणपत कांदळकर,डॉ.प्रवीण बुल्हे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याबाबत चर्चा केली असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या होत्या. तसेच पावसाळी अधिवेशनात देखील नुकसानग्रस्तांना अधिक मदत तातडीने मिळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, अतिृष्टीमुळे १२ गावांमधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही शेतात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे. तसेच पावसामुळे रस्त्यांची देखील वाट लागली असून अनेक ठिकाणी घरांची तसेच शाळेच्या खोल्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी देखील भरीव निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरातील नुकसानीची पाहणी

येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात १२गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत प्रशासनाने तातडीने सर्व पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसामुळे अनेक भागात विजेचे प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने हा प्रश्न सोडवून विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. सिंगल फेज यंत्रणा व्यवस्थित रित्या राबविण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच गोदावरी तट कलव्यावरील मुखेड कॅनाल चारीची २० किलोमिटर अंतरावरील वहन क्षमता वाढविण्यासाठी अधिक पाईपची व्यवस्था करण्यात येऊन तातडीने हे काम करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने चाऱ्या करून देण्यात याव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

मुखेड परिसरातील बिबट्या प्रवण क्षेत्रात तातडीने पिंजरा लावण्याच्या छगन भुजबळ यांच्या सूचना

मुखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. यावेळी छगन भुजबळ यांनी तातडीने पिंजरा लावण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने