येवला येथे रेशीम पार्क उभारण्यासाठी शासनास अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ



येवला येथे रेशीम पार्क उभारण्यासाठी शासनास अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना




येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून येवला तालुक्यातील एरंडगाव येथे उभा राहणार रेशीम पार्क



येवला  :- पुढारी वृत्तसेवा

 येवला शहर हे पर्यटन दृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय महत्वाचे शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने एरंडगाव येथे राखीव करण्यात आलेल्या जागेत रेशीम पार्क उभा करण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


येवला एरंडगाव येथे रेशीमपार्क उभारण्याबाबत आज नाशिक येथील कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालय पुणेच्या सहायक संचालक डॉ.कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी श्री.इंगळे, श्री.सारंग सोरटे, गटविकास अधिकारी अन्सार शेख,दिलीप खैरे, वसंत पवार,शिवाजी खापरे, गोदावरी कन्सल्टंट सर्विसेसचे नितीन सोनवणे, राहुल महाजन, केतन काढवे, वैभव भावसार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.



यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी  दि. २६ जानेवारी २०२० रोजीच्या ग्रामसभा ठरावानुसार ग्रा.पं.एरंडगाव खुर्द ता.येवला यांनी गट नंबर २९३ मध्ये २५ एकर जागा रेशीम पार्क करिता दिली आहे. येवला हे पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैठणी उद्योग व वस्त्रोद्योग आहेत. स्थानिक कारागीर घरोघरी पैठणी तयार करत असतात. मात्र पैठणी तयार करण्यासाठी लागणारा रेशीमधागा परराज्यातून आयात करावा लागतो. या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे (रॉ सिल्क) उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे यासाठी येवला येथे रेशीम पार्कची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.



ते म्हणाले की, येवला येथील पैठणी क्लस्टर कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला किमान १२५ मे.टन कच्चे रेशीम सुत लागणार आहे. त्यासाठी येवला समूह व जवळच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः २५०० एकर तुती लागवड असणे आवश्यक आहे. लागवडीसाठी शासनाने बेणे, रोपे, अंडीपुंज, साहित्य व तुती उद्योगाचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तुती रेशमची अंडीपुंजी बनविण्याकरिता ग्रेनेजची निर्मिती करावी लागणार आहे. तसेच टसर रेशीम शेतकऱ्यांना नियमित दर्जेदार व आवश्यक त्या प्रमाणात अंडीपुंज उत्पादन करून रेशीम उद्योगाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना टसर अंडीपुंजचा नियमित व पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून मड हाऊसची निर्मिती करावी लागणार आहे.  या ठिकाणी शेतकऱ्यांना  तुती व टसर रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या.



ते म्हणाले की, सुधारीत तुती नर्सरी तयार करून वर्षभर तुती लागवडीकरीता रोपाचा पुरवठा होईल असा कार्यक्रम राबविणे, सुधारीत मातृवृक्षांची जोपासना करणे, शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे, केंद्रिय रेशीम मंडळाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून प्रसार व प्रचार कार्यक्रम राबविणे, कोष बाजारपेठ उभारण्यात यावी. हा रेशीम पार्क येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात यावा. यासाठी चिखलदरा व बारामती सारख्या रेशीम पार्कच्या धर्तीवर येवल्यात रेशीम पार्क उभारण्यात यावा. यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासन सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



ते म्हणाले की, या रेशीम पार्क मुळे रेशीम उत्पादकांना कोषविक्रीसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध होईल. या खुल्या बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना तसेच रिलिंग उद्योजकांना व इतर राज्यातील रेशीम उद्योजकांना एकाच ठिकाणी रेशीम कोष व सुत खरेदी विक्री करण्याची सुविधा निर्माण होईल. तुती लागवड करणारे शेतकरी व पैठणी उद्योगाच्या दृष्टीने या ठिकाणी रेशीम पार्कची नितांत आवश्यकता असल्याने त्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
थोडे नवीन जरा जुने