शेती उद्योगाशिवाय महासत्तेचे स्वप्न मृगजळ : प्रा. शिवाजी भालेराव

शेती उद्योगाशिवाय महासत्तेचे स्वप्न मृगजळ : प्रा. शिवाजी भालेराव
सानेगुरुजी विचार व्याख्यानमाला; माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन
---
येवला : पुढारी वृत्तसेवा
भारतीय शेती व्यवसाय हा सत्ता धोरणाचा बळी ठरला आहे. जोपर्यंत शेती व्यवसायाला प्राधान्य देवून श्रम प्रतिष्ठा निर्माण केली जात नाही. तोपर्यंत भारत महासत्ता होवू शकत नाही. भारताचे शेती उपयुक्त क्षेत्र ५३ टक्के इतके आहे. हे राशिया, चिन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशपेक्षा ४.५ पटीने जास्त असतांनाही इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता  खुप कमी आहे. येथील शासन व्यवस्थेने अत्यल्य सिंचनाची व्यवस्था, अत्यल्प कर्ज पुरवठा, बाजार भावाची अनिश्चितता यामुळे भारतीय शेती उद्योग जुगार झाला आहे. असे प्रतिपादन प्रा. शिवाजी भालेराव यांनी केले. चिचोंडी (ता. येवला) येथील सानेगुरुजी विचार व्याख्यानमालेत 'भारतीय शेती व राजकारण' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर हे होते. दरम्यान व्याख्यानमालेचे उद्घाटन येवला तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिचोंडी सारख्या छोट्या गावात व्याख्यानमाला हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून राबवून गावाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच आज भेट म्हणून संविधान हा ग्रंथ देऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय बनकर यांनी वाचन संस्कृती टिकवावी यासाठी प्रत्येक गावातून वाचनालय, ग्रंथालय सुरू झाली पाहिजे असे म्हटले. याप्रसंगी राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, मार्केट कमिटीचे संचालक वसंत पवार, प्राचार्य भाऊसाहेब गमे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड. समीर देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक महेश काळे, मार्केट कमिटीचे संचालक तथा पारेगाव चे सरपंच सचिन आहेर, डॉ.सुरेश कांबळे, ग्रामसेवक संजय व्यवहारे, अजिज शेख, नितीन गायकवाड, बीजेपीचे शहराध्यक्ष आनंद शिंदे, माजी नगरसेवक सुभाष पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चिचोंडी गावची लेक सविता धीवर यांची तलाठी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, अविनाश पवार याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तर नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी बाबासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तिघांचाही यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ यांनी केले तर प्रास्ताविक सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी तर आभार राजेंद्र घोटेकर यांनी मानले.
---
चिचोंडी : येथील साने गुरुजी विचार व्याख्यान मालेत 'भारतीय शेती व राजकीय धोरण' या विषयावर आपले विचार व्यक्त करताना प्रा. शिवाजी भालेराव.
थोडे नवीन जरा जुने