"गाव करील ते राव काय करील"- ' देवनाचा ' धरणासाठी गावकऱ्यांनी करून दाखवले
खरवंडी -देवदरीची ६० हेक्टर गायरान जमीन होणार वन खात्याकडे वर्ग ,
3 कोटी वाढीव खर्चाला मान्यता,
प्रकल्पाचा १३ कोटी वरून १६ कोटीवर ,
५ वर्षाचे प्रशासकीय काम ५ दिवसात पूर्ण ,
वन जमीन अदलाबदलीचा प्रस्ताव दाखल
प्रधान सचिवांच्या आश्वासना नंतर आत्मदहन आंदोलन स्थगित ,जलसंधारण आणि गृह सचिवांनी केले होते आंदोलन न करण्याचे आवाहन
येवला : पुढारी वृत्तसेवा
गाव करील ते राव काय करील ही म्हण येवला तालुक्यातील खरवंडी -देवदरी येथील शेतकऱ्यांनी सार्थ करून दाखवली. देवदरी येथील 'देवनाचा' सिंचन प्रकल्पासाठी वन खात्याची ५५.७५ हेक्टर बुडीत क्षेत्रात जात आहे. त्या बदल्यात लँड बँक, महसूल खाते महाराष्ट्र शासन यांचे कडून पर्यायी जमीन मिळणे प्रस्तावित होते. मात्र असे जमीन हस्तांतरणाचे प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात पडून असतात . त्यामुळे प्रकल्प रेंगाळतात ,खर्च वाढतो आणि प्रकल्प अव्यवहार्य ठरतात . या बाबत वन आणि पर्यावरण खात्याचा मोठा अडसर होता. वन खात्याला सद्याच्या वनजमिनीलगतची गायरान जमीन हवी होती.. तशी जमिन असल्यासच असे अदलाबदलीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार होता.
यावर शेतकर्यांनी एकत्र येऊन मार्ग काढून ग्रुप ग्रामपंचायत खरवंडी -देवदरी यांच्या मालकीची ६० हेक्टर पर्यंत जमीन वन खात्याकडे वर्ग करण्याचा ठराव ग्रुप ग्रामपंचायत खरवंडी यांच्या कडून दि २३ जून २०२३ जलसंधारण खात्याकडे देण्यात आला . त्यावर जलसंधारण खात्याने लगेच कार्यवाही सुरु केली व तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्यात आला.त्यामुळे वन जमिनी ला पर्यायी जमिनीची मुख्य अडचण दूर झाली आहे . गावकऱ्यांच्या एकजूटीचे आणि निर्णयाचे पदसिद्ध जलसंधारण सचिव सु म काळे , अवर सचिव प्र नि पाटील यांनी कौतुक केले आहे.
************
देवनाचा साठवण तलाव लवकरात लवकर पूर्ण होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे . त्यामुळे आषाढी एकादशी च्या दिवशी रोजी पहाटे ४ वाजता मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. दप्तर दिरंगाई झाल्यास पुन्हा आंदोलन उभारले जाईल - संयोजक , जलहक्क संघर्ष समिती, येवला
******************
#########
वन आणि पर्यांवरण खात्याच्या उर्वरीत परवानग्या सक्षम सल्लागार यंत्रणे मार्फत जलसंधारण विभाग मार्गी लावणार आहोत, पर्यायी जमीन गावाने उपलब्ध करून दिल्याने मुख्य अडथळा दूर झाला आहे . प्रकल्पाचा खर्च प्रकल्पाचा १३ कोटी वरून १६ कोटीवर गेला तरी अतिरिक्त खर्चाची तरतूद करण्यात येत आहे , लवकरच प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होईल - ह. का. गिते , जिल्हा जलंसधारण अधिकारी.
###########
अशी लागली यंत्रणा कामाला
देवदरी येथील 'देवनाचा' सिंचन प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा या मागणी साठी खरवंडी ,देवदरी ,रहाडी येथील २३७७ शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करत असताना मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता , त्यामुळे संबंधित जलसंधारण , वन व महसूल आणि गृह खाते खडबडून जागे झाले होते. गृह खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौमिक , जलसंधारण चे सचिव एकनाथ डवले यांनी आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत सूत्रे हलवली , राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ , मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर , नाशिक ग्रामीण चे पोलीस आयुक्त शहाजी उमाप, आंदोलकांच्या हालचाली वर लक्ष ठेवून होते .२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन गेले ३ दिवस नजर कैदेत ठेवले होते. आंदोलकांचे निमंत्रक जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांच्या घरी येवला तालुका पोलिसांचा जागता पहारा होता. मालेगाव विभागीय उपायुक्त अनिकेत भारती , मनमाड उपविभागीय अधिकारी सोहेल शेख , प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक विशाल क्षीरसागर यांनी आंदोलकां बरोबर बैठका घेऊन विषय समजावून घेऊन सातत्याने वरिष्ठांना अहवाल देत होते. मंत्रालयातून आज विविध मागण्यांवर कार्यवाही झाल्याचे समजल्यानंतर आंदोलकांना नजर कैदेतून मुक्त करण्यात आले. मंत्रालय सुरक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित कोरे, मुंबई विशेष शाखा पोलीस निरीक्षक आकाश शिंदे व मुख्यमंत्री कार्यालय विशेष कार्यकारी अधिकारी नितीन दळवी यांच्या मध्यस्थीने लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत आढावा बैठक जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे .
फोटो :- उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांना आंदोलन स्थगित केले असल्याचे पत्र देताना जलहक्क समितीचे भागवतराव सोनवणे, व शेतकरी दिनकर दाणे,रखमा दाणे, दत्तू दाणे, सहसचिव अरुण दाणे.