शिक्षक आमदार किशोर दराडे यांना जळगावला समाज भुषण पुरस्कार प्रदान!
येवला : पुढारी वृत्तसेवा
मागील पाच वर्षात उत्तर महाराष्ट्रात अतिशय प्रभावीपणे काम करून शिक्षकांसह विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा जळगाव येथे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था (मेहरुण) व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार दराडे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी संत भगवान बाबा आणि (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी 'उमवि'च्या व्यवस्थापन परिषद सदस्या सुरेखा पालवे,महापालिका उपायुक्त गणेश चाटे, ज्येष्ठ कवी वा.ना.आंधळे,मुख्याधिकारी विकास नवाळे,पीएसआय दत्तात्रय पोटे,वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केजी टू पीजी पर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे काम आमदार दराडे यांनी केले आहे.मागील पाच वर्षात शाळांना शैक्षणिक साहित्य व निधीसाठी प्रथमच सर्वाधिक निधी आमदार दराडे यांनी खर्च केला आहे.विशेष म्हणजे शिक्षकांच्या वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासह शाळांना अनुदान मिळणे व जुन्या पेन्शन योजनेसाठी शासन स्तरावर त्यांचा नेहमी लढा दिला आहे.अनेक गरजूंनाही मदतीचा हात दिल्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजभूषण पुरस्कार दिल्याचे यावेळी अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी,सचिव महादू सोनवणे आदींनी सांगितले.
दरम्यान,समाज बांधवांनी सन्मान करून माझ्या कामाचा केलेला गौरव अजून चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भविष्यात पाचही जिल्ह्यातील शिक्षकांसाठी नेहमीच शासन दरबारी आवाज उठवत राहील असे आश्वासन आमदार दराडे यांनी दिले
उमेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले, महादू सोनवणे यांनी आभार मानले.
फोटो
जळगाव : आमदार किशोर दराडे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करताना जळगाव जिल्ह्यातील समाजाचे पदाधिकारी.