शासनाच्या योजना कामगारांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून द्या - मंत्री छगन भुजबळ

 


शासनाच्या योजना कामगारांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून द्या - मंत्री छगन भुजबळ


येवला :  पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाचे कामगार विभाग हा कामगारांच्या हितासाठी विविध योजना राबवितात या योजनांचा लाभ कष्टकरी कामगारांना मिळण्यासाठी या योजना त्यांच्या पर्यंत यशस्वीरित्या पोहचवा असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील माऊली लॉन्स येथे बांधकाम कामगारांना संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,कामगार उपायुक्त विकास माळी,प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,शहराध्यक्ष दिपक लोणारी,येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बापू गायकवाड,संचालक सविता पवार, रतन बोरनारे, कांतीलाल साळवे, भास्कर कोंढरे, प्रवीण गायकवाड, अतूल घटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कामगार हा आपल्या देशाचा कणा आहे. ही पृथ्वी कामगारांच्या श्रमावर उभी आहे असं स्पष्ट मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडलं होत. कष्टकरी कामगाराला शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विविध सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. देवघरात देवपूजा केल्यानंतर जितके पुण्य आपल्याला मिळेल तितकेच पुण्य आपल्याला कष्टकरी कामगारांच्या सेवेतून प्राप्त होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


ते म्हणाले की, कामगार कल्याण मंडळ हे केवळ कामगाराचे नाही तर त्याच्या कुटुंबीयांचे देखील रक्षण करते. कामगारांसोबत त्याच्या कुटुंबाला देखील आधार देण्याचे काम हे मंडळ करत असते. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी या मंडळावर अधिक अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
थोडे नवीन जरा जुने