व्यापक जनलढा उभा करणे ही काळाची गरज : कॉ. भगवान चित्ते

 व्यापक जनलढा उभा करणे ही काळाची गरज : कॉ. भगवान चित्ते


येवला (प्रतिनिधी) : खाजगीकरण व बाजारीकरण यांच्या विरोधात विविध जाती समूहांना सोबत घेऊन व्यापक जनलढा उभा करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. भगवान चित्ते यांनी केले.




साहित्यरत्न कॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्ताने महात्मा फुले नगरात आयोजित कार्यक्रमात कॉ. चित्ते बोलत होते. प्रारंभी प्रतीमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


शोषित, वंचित, शेतकरी, कामगार, आदिवासी व स्त्रिया या गरीबी आणि व्यवस्थेच्या वरवंट्याखाली दबलेल्या लोकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा व कादंबऱ्यांमध्ये नायकत्व बहाल करून त्यांचे प्रश्न, दुःख मांडले. दुर्लक्षित वर्गाच्या कर्तुत्वाचा व संघर्षाचा आवाज अण्णाभाऊ बनले.  जाती व्यवस्था व भांडवलशाहीच्या जबड्यामध्ये नवी पिढी भरडली जात आहे. नव भांडवलशाही तरुणांना देशोधडीला लावीत असल्याचेही यावेळी कॉ. चित्ते म्हणाले.



परदेशात उच्च शिक्षणासाठी भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. या विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी दरवर्षी शासनाचे काही लाख कोटी रुपये खर्च होतात. मात्र यात शेतकरी, मजूर, कष्टकरी यांची मुले कुठेच दिसत नाही. परदेशी शिक्षणावरील या खर्चात आपल्याच देशात शेकडो विद्यापीठे उभी राहू शकतात. आरक्षणातील उपवर्गीकरण लढा आता महाराष्ट्रात उभा राहिला आहे. सर्वच स्तरावरील खाजगीकरण व बाजारीकरण यामुळे दलित, शोषित वर्ग प्रवाहा बाहेर फेकला जात असल्याचे यावेळी बोलताना माजी नगरसेविका कॉ. चाहाबाई अस्वले यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांच्या श्रमशक्तीतून निर्माण होणारी आर्थिक वरकड मूल्य निर्माण होऊ दिली जात नाही, उलट पक्षी शेतकरी व कष्टकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झालेली व उभी राहिलेली संपत्ती वरचढ जात वर्गीय व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात आहे. एका बाजूला शेतकरी श्रमिक व कष्टकरी कंगाल होताना दिसत असून उच्च जातीय व्यापारी वर्गाच्या संपत्तीचे दिवसेंदिवस आकडे फुगत आहेत. अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला वर्ग व जाती अंताचा लढा आता तुम्हाला आम्हाला लढावा लागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन संसारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद चित्ते यांनी केले. आभारप्रदर्शन बाबूलाल पडवळ यांनी केले. कार्यक्रमास मंगला खरात, साहेबराव खरात, प्रविण खंडागळे, दिनकर संसारे, विश्वनाथ कांबळे,छायाबाई खंडागळे ऐश्वर्या चित्ते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने