येवल्यात ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास आराखडा’ बेकायदेशीर असल्याचा आरोप, चौकशीची मागणी
येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील ममदापूर येथील ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास आराखडा २०२३-२४’ बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते देविदास गुडघे यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांनी संगनमताने हा आराखडा मनमानी पद्धतीने तयार केल्याचा आरोप करत, या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गुडघे यांनी पंचायत समिती कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत ममदापूर तांडा वस्ती, मल्हारवाडी, वैद्य वस्ती, शांतीनगर, अहिल्यादेवी नगर, साबळे वस्ती आणि बत्तासे वस्ती या भटक्या विमुक्त जमातीच्या वस्त्यांचा समावेश वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत करण्यात आला आहे. मात्र, या वस्त्यांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीचा विकास आराखडा ग्रामसभेत मंजूर न करताच तयार करण्यात आला आहे. असा आरोप देविदास गुडघे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
या आराखड्यानुसार सुरू झालेली कामे बेकायदेशीर असून, यामागे शासनाचा निधी हडप करण्याचा आणि भ्रष्टाचार करण्याचा संबंधितांचा मोठा उद्देश असल्याचा आरोपही गुडघे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत सुरू असलेली कामे थांबवण्याची आणि नवे प्रस्ताव स्वीकारू नयेत अशी निवेदनामध्ये विनंती केली आहे. निवेदनावर सयाजी गुडघे, गौरव वैद्य, गणेश गायकवाड, अनिल गुडघे, ज्ञानेश्वर काळे, गणेश गुडघे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
जर या प्रकरणात तातडीने चौकशी झाली नाही, तर या बाबीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन आंदोलन करण्याचा इशाराही गुडघे यांनी दिला आहे.