येवला व अंदरसुल मध्ये मराठ्यांचा जल्लोष
येवला :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनाचा विजयोत्सव येवला शहरासह येवला-लासलगाव मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाने जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आणि हा मराठा समाजाचा विजय असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, संपूर्ण येवला तालुक्यात मराठा आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केला.
येवला शहरातील विंचूर चौफुलीवर सचिन आहेर, प्रमोद पाटील, नंदू जाधव, वाल्मिक गोरे, आदेश काळे, समाधान पवार, मोहन गाडेकर, संदीप बरशिले, काकासाहेब कदम, निलेश शिंदे, भागवत जाधव, मच्छिंद्र पवार, अमोल भोसले, आदींसह शेकडो मराठा बांधवांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करीत चौफुलीवर प्रमाणावर गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवीत आनंद व्यक्त केला.
येवल्यातील अंदरसुल गावात डीजेच्या तालावर नाचत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना गुलाल लावत जल्लोष करण्यात आला. यावेळी मिठाई वाटून मराठा बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी अंदरसुल येथे बोलताना एडवोकेट शाहू राजे शिंदे यांच्यासह आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले, ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. हा विजय गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळवून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यातही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.