खतांच्या दरवाढीविरोधात 'छावा क्रांतीवीर सेने'चा येवल्यात मनमाड रस्त्यावर रस्ता रोको..
येवला :
केंद्र सरकारने अचानक रासायनिक खतांच्या दरात केलेल्या भरमसाट वाढीविरोधात आज (दि. २७ ऑक्टोबर) छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड महामार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले. गोरख संत आणि प्रफुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे सुमारे एक ते दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
आंदोलकांनी यावेळी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. "एकीकडे जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा करायला लावतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना खताच्या गोण्यांवर २०० ते ३०० रुपयांची दरवाढ करून देतात," असा संताप शेतकरी व्यक्त करत होते. सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांचे भाव वाढले नसतानाही, खतांचे भाव वाढवल्यामुळे "शेतीमालाला भाव नाही, मग रासायनिक खते आणि औषधींचे भाव वाढ का?" असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला.
आंदोलकांनी निवेदन स्वीकारण्यासाठी शासनाचा कोणताही प्रतिनिधी घटनास्थळी येण्याची मागणी केली होती. मात्र, तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी लवकर न आल्याने आंदोलक अधिक चिडले आणि यावेळी आंदोलकांची व पोलीस बांधवांची शाब्दिक बाचाबाची पण झाली. आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
अखेरीस, पोलिसांच्या मध्यस्थीने सुमारे एक तासानंतर हे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले. यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी, "सरकारकडे तुमच्या मागण्या मान्य करायला लावू आणि लवकरात लवकर भाव कमी करू," असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी गोरख संत, प्रफुल गायकवाड, विजय मोरे, सोपान लांडगे, संदीप पवार, वैभव भड, प्रिया वर्पे, गोरख सांबरे, गोरख कोटमे आणि गणेश कदम हे उपस्थित होते.

