येवल्यात शिवसेना शिष्टमंडळाची तहसीलदार महाजनासोबत बैठक

 अडचणी दूर करत शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा करा

आमदार किशोर दराडेची मागणी,येवल्यात शिवसेना शिष्टमंडळाची तहसीलदार महाजनासोबत बैठक
येवला : अनुदानाच्या त्रुटीसंदर्भात तहसीलदार आबा महाजन यांच्याशी चर्चा करताना आमदार किशोर दराडे,तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, किशोर सोनवणे, शहरप्रमुख अतुल घटे आदी.

तालुक्यात अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेले नाही.या संदर्भात प्रशासनाने गणपती येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडून शेतकऱ्यांना अनुदानाचा वेळत लाभ द्यावा अशा सूचना आमदार किशोर दराडे यांनी केल्या.
तालुक्यात ६३ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी सुमारे ३८ कोटींचे अनुदान शासनाने मंजूर केले आहे.दिवाळीपूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या,मात्र अद्याप अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.त्या पार्श्वभूमीवर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करा या मागणीसाठी तालुका शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्यात आली.

यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे,तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके,उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुक्याला जवळपास ३९ कोटी रुपये निधी तालुका प्रशासनाकडे प्राप्त झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होत आहे.फार्मर आयडी व दिलेली माहिती जुळत नसल्यामुळे तसेच काही शेतकऱ्यांची ई केवायसी न झाल्यामुळे देखील अशा शेतकऱ्यांना अनुदान जमा होण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती यावेळी तहसीलदार महाजन यांनी दिली.
गाव पातळीवर कर्मचाऱ्यांना सूचना देऊन संबंधित अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून या अडचणी दूर करून सोडवणूक करावी अशी मागणी आमदार दराडे, शेळके यांनी केली.
याबाबत दराडे यांनी तात्काळ जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहे त्यांची यादी करावी व यादीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही, अडचण आहे अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी तात्काळ करून घ्यावी अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली.
तहसीलदार महाजन यांनी सांगितले की, तलाठी व संबंधितांकडून अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांकडून तात्काळ माहिती संकलित केली जाईल. ई केवायसीसाठी सर्वरची अडचण येत आहे,त्यामुळे ई-केवायसीला विलंब होत आहे.पण संपूर्ण शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे सामायिक उतारे असल्यामुळे सहमती पत्र मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ सहमती पत्र देखील जमा करावे अन्यथा ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील. शेतकऱ्यांनी देखील तात्काळ आपले सहमती पत्र संबंधित प्रशासनाकडे जमा करावे असे आवाहन तहसीलदार आबा महाजन व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.या बैठकीस शिक्षक आमदार किशोर दराडे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके,उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे,किशोर सोनवणे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख श्रावण देवरे,शहरप्रमुख अतुल घटे,उपतालुकाप्रमुख संतोष वलटे आदी उपस्थित होते.

"शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा सूचना केल्या होत्या.प्रशासनाने सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. अद्यापही २० हजाराच्या आसपास शेतकरी बाकी आहे तर निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे वेगाने निधी जमा करण्याच्या कामाला गती द्यावी.अडचणी असलेल्या शेतकऱ्यांच्या त्रुटी प्रशासनाने तात्काळ दूर करून मदतीचा लाभ द्यावा."
- किशोर दराडे,आमदार

"शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे,त्यात अनेक शेतकऱ्यांनी सहमतीपत्र दिलेले नाही तसेच तसेच अनेकांचे ई केवायसी बाकी आहे. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत,अडचण आल्यास शिवसेनेसोबत संपर्क साधावा,आम्ही केव्हाही मदतीसाठी तयार आहोत."
-पांडुरंग शेळके,शिवसेना,तालुकाप्रमुख.



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने