येवल्यातील ६४ हजार शेतकऱ्यांसाठी दिलासा! अतिवृष्टी अनुदानाचे वाटप लवकरच; E-KYC आणि संमतीपत्र तातडीने जमा करण्याचे आवाहन
येवला :
येवला तालुक्यात दिनांक २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (पावसामुळे) झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १२४ गावांमधील ६४,४८० शेतकरी बाधित झाले असून, एकूण ४५,३३८.२१ हेक्टर आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचनामा पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली आहे.
आजपर्यंत बाधित खातेदारांपैकी ४३,९८१ खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. फॉर्मर आयडीची माहिती अचूक जुळत असलेल्या बाधित खातेदारांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित आणि त्रुटी असलेल्या खातेदारांना अनुदानाची रक्कम त्वरित मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तहसीलदार आबा महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या खातेदारांची माहिती जुळत नाही, अशा इतर खातेदारांना E-KYC करणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर एकापेक्षा अधिक (सामूहिक) खातेदारांची नावे असल्यास, अनुदान मिळवण्यासाठी संबंधित पालक अधिकारी/विभागाकडे त्वरित लेखी संमतीपत्र जमा करणे बंधनकारक आहे. या संमतीपत्रात अनुदानाची रक्कम कोणाच्या खात्यावर जमा करायची आहे, याचा लेखी उल्लेख असणे आवश्यक आहे. संमतीपत्रासोबतच आधारकार्ड, बँक खात्याची सविस्तर माहिती पंचनामा करणारे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा करण्याकरिता खातेदारांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली.
येवल्यातील सुमारे ६४ हजार शेतकऱ्यांच्या अनुदानाचे काम प्रगतीपथावर असून, आवश्यक कागदपत्रांची तातडीने पूर्तता केल्यास उर्वरित बाधित शेतकऱ्यांनाही लवकरच अनुदानाचा लाभ मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


