नायलॉन मांजाचा येवल्यात कहर! 11 वर्षीय बालकाच्या पायाला 17 टाके; प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न

 नायलॉन मांजाचा येवल्यात कहर! 11 वर्षीय बालकाच्या पायाला 17 टाके; प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न

येवला : 


संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात हर्षद राजू खलसे (वय ११) हा चिमुरडा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पायाला वाचवण्यासाठी डॉक्टरांना तब्बल १७ टाके घालावे लागले आहेत.

आज सायंकाळी लक्कडकोट येथील रहिवासी हर्षद नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकला. मांजाच्या धारदार धाग्यामुळे त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला आणि स्नायूला मोठी व खोल जखम झाली आणि मोठा रक्तस्राव सुरू झाला.


हर्षदवर उपचार करणारे डॉक्टर राहुल चंडालया यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "संक्रांत सुरू होण्यापूर्वीच नायलॉन मांजामुळे जखमी झालेले रुग्ण येत आहेत. यापूर्वी गळा चिरला गेल्याने एक रुग्ण मरता-मरता वाचला होता." डॉक्टरांनी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर १००% टाळावा, असे कळकळीचे आवाहन केले आहे, जेणेकरून मनुष्य आणि पशुपक्षी यांच्या जीवाला धोका होणार नाही.

शासनाने बंदी घातलेला जीवघेणा मांजा शहरात सर्रास उपलब्ध असल्याने स्थानिक प्रशासनाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दुर्घटनेनंतर मांजा विक्रेत्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने