स्थानिकांना टोलमाफी द्या पिंपळगाव जलाल, गवंडगाव टोल नाका भाजपची मागणी

येवला, दि. ४ - तालुक्यातील येवला-कोपरगाव राज्य महामार्गावरील पिंपळगाव जलाल व येवला-वैजापूर राज्य महामार्गावरील गवंडगाव येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलवसुलीतून माफी देण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष मनोज दिवटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे केली आहे.
भाजपने फेब्रुवारी २०११ मध्ये स्थानिकांना टोलवसुलीतून माफी मिळावी यासाठी टोलबंद आंदोलन केले होते. यानंतर वेळोवेळी मागणी करून भाजपच्या वतीने पाठपुरावाही करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलेही सकारात्मक पाऊल याबाबत टाकले नाही. जिल्ह्यातील पिंपळगाव-बसवंत येथे स्थानिक नागरिकांना टोलवसुलीतून माफी मिळते, मग सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनाच वेगळा न्याय का, असा सवालही या निवेदनात भाजपने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिकांना टोलवसुली माफीचा निर्णय न घेतल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व उद्भवलेल्या परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार राहील, असा इशारा भाजप शहराध्यक्ष मनोज दिवटे यांच्यासह बाबासाहेब कोटमे, राम बडोदे, जगन्नाथ मोरे, मयूर गायकवाड, राजेंद्र नागपुरे, विनोद परदेशी, विजय परदेशी, अजय परदेशी, पंकज पहिलवान, जीतेंद्र पहिलवान यांनी दिला आहे.
थोडे नवीन जरा जुने