कोटमगाव जगदंबा देवस्थानची सुरक्षा कडक करणार अध्यक्ष सही न करताच बैठकीतून पळाले

येवला - कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिरात मंगळवारी पहाटे साडेचार लाखांची चोरी झाल्यानंतर देवस्थानचे ट्रस्ट खडबडून जागे झाले. सुरक्षिततेच्या मुद्यावर ट्रस्टच्या अध्यक्षांनी विश्‍वस्तांची बैठक बोलावली खरी, परंतु याच बैठकीत झालेल्या ठरावांच्या प्रोसिडिंगवर अध्यक्ष सही न करताच निघून गेले. दरम्यान या बैठकीत सुरक्षिततेविषयी चर्चेस आलेले ठराव विश्‍वस्तांनी सर्वानुमते मंजूर केले आहेत.
कोटमगाव येथे श्री जगदंबा देवस्थान ट्रस्टची बैठक ट्रस्टचे अध्यक्ष यादवराव कोटमे यांनी बोलावली होती. बैठकीला अध्यक्षांसह विश्‍वस्त रामचंद्र लहरे, भाऊसाहेब आदमने, माधव धांद्रे, रावसाहेब कोटमे हे पाच विश्‍वस्त हजर होते. मंदिरातील चोरीबाबत व परिसरात सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजना यावर विचारविनिमय करण्यात आला. मंदिराची सुरक्षा व्यवसथा कडेकोट असावी यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आले. मंदिर परिसरात एकूण १६ सीसी टीव्ही उच्च दर्जाची झूम सिस्टीम असलेले व इंटरनेट सुविधेसह बसविण्यात यावे, मंदिराच्या मुख्य भागात उच्च दर्जाचे पिनहोल कॅमेरे स्वतंत्र डीव्हीआरसह बसविण्यात यावे, मंदिरात प्रवेश करताना व बाहेर जाताना दरवाजाजवळ उच्च दर्जाचे मॅग्नेटिक सेन्सॉर व गाभार्‍याच्या प्रवेशद्वाराजवळही सेन्सॉर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व विषय सर्वानुमते मंजूर होताना प्रत्येक कामाची निविदा ट्रस्टचे अध्यक्ष यादव कोटमे यांच्या सहीने मंजूर करण्याचा तसेच झालेल्या प्रत्येक कामाचे बिल हे अध्यक्षांच्या सहीने मंजूर झाल्यानंतरच सदर निविदाधारकांना बिल देण्याचे ठरविण्यात आले. अध्यक्षांना सर्व अधिकार विश्‍वस्त मंडळाने दिल्यानंतर बैठकीतील सर्व विषयांना अध्यक्षांसमोर सर्वानुमते मंजुरी झाल्यानंतर जेव्हा प्रेसिडिंगवर सही करण्याची वेळ आली तेव्हा ट्रस्टचे अध्यक्ष यादव कोटमे हे बैठकीतूनच सही न करता निघून गेले. यानंतर सर्व विश्‍वस्तांच्या सहीने प्रोसिडिंग बंद करून कामकाज आटोपल्याचे जाहीर करण्यात आले.
बंदूकधारी सुरक्षा रक्षक नेमणार
मंदिरासह परिसराची सुरक्षा व्यवस्था चोखपणे हाताळण्यासाठी बंदूकधारी सुरक्षा रक्षक नेमण्यावर सर्व विश्‍वस्तांची सहमती झाली. परवानाधारक सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात देण्याचे ठरविण्यात आले. या सर्व विषयांचे सूचक विश्‍वस्त रावसाहेब कोटमे तर अनुमोदक माधव धांद्रे हे होते.
थोडे नवीन जरा जुने