मेळाच्या बंधार्‍यास भुजबळांचा नकार-----पत्रकार परिषदेत कृती समितीची माहिती

येवला - तालुक्यातील ममदापूर परिसरातील आठ गावे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ममदापूर येथे मेळाचा प्रकल्प बंधारा करणार असल्याचे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीतील जाहिरनाम्यात म्हटले आहे; परंतु अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. मागील पंधरवडय़ात कृती समितीच्या शिष्टमंडळाने ना. भुजबळांची भेट घेऊन निवेदन दिले; मात्र भुजबळांनी सदर सदस्यांना बंधारा होणार नाही, असा स्पष्ट शब्दांत टोलवून लावल्याने याकामी शासनाचे लक्ष केंद्रीत होण्यासाठी आठ गावांचे ग्रामस्थ 18 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ करीत असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.

तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळगाव, रेंडाळा, सोमठाण जोश या भागात शेती व पिण्यासाठी लागणारे पाणी यांच्या कुठल्याच योजनेचा या भागात वापर करण्यात आलेला नाही. 38 गाव पाणीपुरवठा योजना, पुणेगाव-दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा, पालखेड डावा कालवा या एकही योजनेचे पाणी या आठ गावांना मिळत नसून, पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर ही गावे अवलंबून आहेत; परंतु या परिसरात एकही मोठे धरण किंवा बंधारा नसल्याने पावसाळ्यात पावसाचे सर्वच पाणी वैजापूर व नांदगाव तालुक्यात वाहून जाते. परिणामी येथील शेती व पिण्याच्या पाण्याची नेहमीच कमतरता असते. नाशिक जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या ष्टीने ममदापूर गावाचा दुसरा क्रमांक लागतो; परंतु जास्तीचे क्षेत्र वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने पाणी अडविण्यासाठी अडचण येत असल्याचे आजपर्यंत लोकप्रतिनिधी सांगत आहे. या भागात चार हजार हरिण, साठ लांडगे, तरस, कोल्हे, मोर आदी पशुपक्षी आहेत. डोंगराळ भाग असल्याने गाय, शेळी, मेंढी आदींची संख्या 15 ते 16 हजार आहे. उन्हाळ्यात बरेच मेंढपाळ बाहेरगावी जातात. सदर मेळ्याचा बंधारा झाल्यास परिसरातील आठ गावांची शेती ओलिताखाली येईल, कारण या बंधार्‍यात 40 दलघफू पाणी साचणार असून, 28 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे आठही गावांचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वन्य प्राणी, पाळीव प्राणी आदींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. वैजापूर तालुक्यात पाराळा येथे मन्याड प्रकल्प व नांदगाव तालुक्यात माणिकपुंज येथे वनविभागाच्या हद्दीत बंधारे बांधले आहेत. त्याचप्रमाणे ममदापूर येथील वनविभागात मेळाचा बंधारा प्रकल्प व्हावा, अशी मागणी आठ गावच्या ग्रामस्थांची असून, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, वनविभाग अधिकारी, खा. हरिश्चंद्र चव्हाण, खा. समीर भुजबळ आदींना देण्यात आले आहे. ममदापूर येथील वनविभागात बंधारा बांधण्यासाठी जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने, निदर्शने करणार असून, काम पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे मेळाचा बंधारा (प्रकल्प) साठवण कृती समितीने निवेदनात म्हटले आहे. यासाठी 18 फेब्रुवारीपासून ममदापूर येथील डोंगराळ भागात या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी ग्रामस्थ सकाळी 11 वाजेपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ करणार आहेत. या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय वैद्य, उपाध्यक्ष दिलीप मिडमे, सरचिटणीस आबासाहेब केरे, कार्याध्यक्ष पी. डी. मोराणे, रमेश जाणराव, बाळासाहेब जाधव, अँड. संतोष वैद्य, राजेंद्र गुडघे, भानुदास वैद्य आदी उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकल्पाबाबतचे निवेदन येवला दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांना देण्यासाठी कृती समितीचे शिष्टमंडळ गेले होते; मात्र कुणाच्यातरी सांगण्यावरून भुजबळांनी शिष्टमंडळाला टोलवून लावले व बंधारा होणार नाही, असे स्पष्ट केल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
थोडे नवीन जरा जुने