गरजेपुरता हमाल-मापारी असताना नोकर भरतीची गरज काय? मारोतराव पवार यांचा आरोप


येवला - येथील बाजार समितीमध्ये सुरू असलेली हमाल-मापार्‍यांची नोकर भरती केवळ संचालक मंडळाने आर्थिक फायद्यासाठीच काढली आहे, असा आरोप तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांनी  करून गरजेपुरता हमाल-मापारी असताना नोकर भरतीची गरज काय? असा सवालही त्यांनी केला आहे. येवला बाजार समितीत १२१ हमाल व ५१ मापारी आहेत, तर अंदरसूल उपबाजार आवारावर ८४ हमाल, ९२२ मापारी कामावर आहेत. गरजेपुरती हमाल-मापारींची संख्या असताना मुख्य आवारावर संचालक मंडळ व सचिवांनी १८ हमाल व ४ मापार्‍यांची भरती केली. नोकर भरतीमध्ये प्रत्येक संचालकांसह सचिवाला उमेदवारांमध्ये वाटा आहे. बाजार समितीमधील एक हमाल मयत झाला व एकाला अर्धांगवायूचा झटका आल्याने या दोघा हमालांच्या मुलांचा विचार व्हावा, असे आपण सचिवांना सुचविले होते; परंतु उमेदवारांचे पैसे मिळणार नाहीत, म्हणून सचिवांसह संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. नोकर भरती करताना संचालक मंडळाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात काहीजण पवार यांनी ही पैसे गोळा केल्याची चर्चा केली होती त्यामुळे नेहमी शांत असणाऱ्या माजी आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. आपल्या आयुष्यात कोणाकडूनही नोकरीसाठी पैसे घेतले असे म्हणणारा दाखवावा असे आवाहनही त्यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने