दीडशे वर्षांची परंपरा मोडीत येवलेकरांची कोरडी रंगपंचमी

येवला - येवला शहरवासीयांची सण साजरे करण्याची पद्धत अतिशय उत्साही म्हणून प्रसिद्ध आहे. रंगपंचमीत तर येवलेकर अक्षरश: बेधुंद होऊन रममाण होतात. येथील टिळक मैदानात रंगांचे सामने खेळले जातात. दीडशे वर्षांची ही परंपरा आहे. मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली. येवलेकरांनी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मनाचा मोठेपणा दाखवीत आज सामने न खेळता एकत्रित येऊन कोरडी रंगपंचमी साजरी केली. शिवाय या पाण्याचा एक टँकर राजापूरच्या जंगलातील हरणांना तर एक टँकर गौशाळेतील गाईंना पिण्यासाठी पुरवून आदर्श ठेवला आहे.
शहर-तालुका दुष्काळात होरपळत असून २५ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर गावोगावी पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती होत आहे. शहरालाही सहाव्या दिवशी पाणी येत आहे. अशा स्थितीत रंगांचे सामने खेळून पाण्याचा अपव्यय करणे हा सामाजिक असंवेदनशीलपणा असल्याने उत्सव समितीने सामन्यांना ‘ब्रेक’ दिला. सामने नसले तरी उत्सवप्रियता जपताना नागरिकांनी टिळक मैदान व डीजी रोडवर एकत्रित येऊन एकमेकांना रंगांचा टिळा लावला. सकाळी राजापूरला जाऊन उत्सव समितीने हरणांसाठी वनविभागाने बनविलेल्या ‘वॉटर होल’मध्ये टँकरभर पाणी ओतून वन्यजीवांची तहान भगविली.
सकाळीच उत्सव समितीचे भोलानाथ लोणारी, प्रभाकर झळके, संजय कुक्कर, महेश वडे, पारस भंडारी, किशोर सोनवणे, बाजीराव सस्कर यांनी येवल्याहून पाण्याचा टँकर घेऊन थेट राजापूरचे जंगल गाठले. हरणांसाठी बनविलेल्या ‘वॉटर होल’मध्ये त्यांनी हे पाणी टाकले. त्यानंतर येवल्यातील पांजरपोळ या संस्थेच्या गौशाळेतील गाईंसाठी एक टँकर पाणी दिले. पाण्याचा अपव्यय टाळून समितीने टंचाईत राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वांनीच स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता टिळक मैदानात जमून रंगाचे सामने न खेळता सर्वांनी एकमेकांना रंग लावून कोरडी रंगपंचमी साजरी केली. प्रारंभी भोलाशेठ लोणारी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर फटाके वाजवितानाच रंगांची उधळण करून हलकडीच्या तालावर ठेका धरून उत्सवप्रेमींनी आनंद लुटला. टिळक मैदानातून निघाल्यानंतर हलकडीच्या तालावरच नाचत-नाचत कार्यकर्ते पुन्हा घराकडे परतले. नगरसेवक सुनील काबरा, बंडू क्षीरसागर, दत्ता नागडेकर, बाळू गायकवाड, लाला कुवकर, भूषण शिनकर, मुकेश लचके, राजू लोणारी, किशोर सोनवणे, संजय सोमासे आदी प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. हे सर्वजण टिळक मैदानातून डीजी रोडवर जाऊन तेथेही कोरडी रंगपंचमी खेळले. डीजी रोडवर नवभारत मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुवकर, संजय कुवकर, अविनाश कर्‍हेकर यांनी कार्यकर्त्यांसह कोरडी रंगपंचमी खेळली.
प्रत्येक गल्लीत रंगांची उधळण होत होती. मुले व तरुणाई यासाठी कुठे ओला तर कुठे कोरड्या रंगांचा वापर करीत होती. अनेकांनी पाण्याअभावी रंगांच्या उत्सवापासून दूर राहणेच पसंत केले. असे असले तरी बच्चे कंपनीचा उत्साह दांडगा होता. घरातील साठवलेले पाणी मुलांकडून वापरले जात असल्याने याची चिंता अनेक गृहिणी-महिलांना होती. त्यामुळे मुलांपासून पाण्याचे संरक्षण करण्याची जबाबदारीही गृहिणींना पार पाडावी लागते. विशेष म्हणजे सुंदरराम मंदिराबाहेर हलकडीच्या तालावर झांज खेळून नाचत महिलाही रंगपंचमी खेळल्या.
सटवाई मातेची मिरवणूक
रंगपंचमीनिमित्त शहरातून सटवाई मातेची मिरवणूक काढण्याची शंभर वर्षांची परंपरा असून या परंपरेनुसार आजही सटवाई मातेची मिरवणूक काढण्यात आली. नवसाला पावणारी सटवाई माता अशी समजूत असल्याने प्रत्येक गल्लीत रथ येताच दर्शनासाठी महिलांची गर्दी होत होती. अनेक महिलांनी नवसपूर्ती करण्यासह नवसही कबूल केले. या रथात एका भक्ताने सटवाईचे रूप धारण केले होते. तसेच परंपरेप्रमाणे बालाजी मंदिरात सायंकाळी दर्शनासाठी येवलेकरांनी गर्दी केली होती.
तालुक्यातील गावोगावचे रहिवाशी दुष्काळाचा सामना करीत आहेत. ४०-४५ गावांत प्यायला पाणी उपलब्ध नाही. अशा स्थितीत रंगांचे सामने खेळणे उचित नव्हते. त्यामुळे परंपरा असली तरी आम्ही सामने न खेळता कोरडी रंगपंचमी साजरी केली. तसेच पाण्याचा सदुपयोग व्हावा यासाठी राजापूरच्या जंगलांत हरणांना टँकरने पाणी पुरविले.
- भोलानाथ लोणारी, माजी नगराध्यक्ष, उत्सव समिती प्रमुख
थोडे नवीन जरा जुने