येवला नगरपालिकेतील बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराची तातडीने चौकशी करा........परदेशी यांची मागणी

येवला : येथील नगरपालिकेतील बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे येवला विभागीय अध्यक्ष ब्रह्मनंद परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली.शहरातील गणेशचाळ येथील पालिकेने सन १९७१ मध्ये बांधलेले व ठराव करून व्यवसायासाठी दिलेले व्यापारी गाळे पालिका मुख्याधिकारी मेनकर यांनी बेकायदेशीरपणे पाडले असून, या गाळ्यांच्या चौकटी, पत्रे, फरताळ आदि सामान कुठे गेले याची चौकशी होणे गरजेचे आहे. सि.स.नं. ३९0७ येथे पाच वर्षांपूर्वी अनधिकृत म्हणून पाडलेले गाळे दोन वर्षांपूर्वी मुख्याधिकारी मेनकर यांच्या समोर उभे राहिले, हा न्यायालयाचा अवमान आहे. मुख्याधिकारी मेनकर यांनी स्वच्छता विभागात तीन कर्मचार्‍यांची बेकायदेशीरपणे भरती केली. यात लाखोंचा गैरप्रकार झाल्याचा आरोपही परदेशी यांनी करत या प्रकरणी चौकशी करून मुख्याधिकारी मेनकर यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी केली. येसगाव येथील पालिकेची येवला ते येसगाव जुनी जलवाहिनी ही ११ कि.मी. असून, सदर जलवाहिनी काढण्याचे टेंडर वाल्मीकी मजूर संस्थेला देण्यात आले होते. त्यात फक्त दीड किलोमीटर जलवाहिनी काढण्यात आल्याचे दाखविले. यातील बाकी राहिलेली ९.५ कि.मी. जलवाहिनी व त्याची सामग्री गायब असल्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हायला हवी, असे स्पष्ट करून कासार गल्ली येथील रस्ता कॉँक्रीटीकरणाचे काम कार्यारंभ आदेशापूर्वीच पूर्ण केले व तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पालिका हद्दीतील दलितवस्तीत लोकसंख्येनुसार कामे न करता विशिष्ट एका वॉर्डातच बहुतांशी कामे करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोपही परदेशी यांनी करून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक मनोहर जावळे यांच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केलेला असून, या प्रकरणी कारवाई न झाल्यास जिल्हा धिकार्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट करून खोटी संस्था व उत्सव समितीच्या नावाने फंड गोळा करून पालिकेत भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपही परदेशी यांनी केला आहे. यासंदर्भात श्रावण जावळे यांच्याविरुद्ध आपण संबंधितांकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्याधिकारी मेनकर यांची झालेली नियुक्तीच बेकायदेशीर असून, प्रशासकीय कामाचा अनुभव नसतानाही मेनकर यांनी दिलेल्या नियुक्तीची सर्वंकष चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्याची मागणीही आपण केल्याचे ते म्हणाले.
थोडे नवीन जरा जुने