प्रभाकर झळके यांचे वस्तुसंग्रहालयास ना.छगन भुजबळ यांची भेट

येवला (अविनाश पाटील) "घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती....." असं
एका कवीने म्हटले आहे. म्हणूनच प्रत्येक घरातील व्यक्ती आपल्या आवडी -
निवडी प्रमाणे घराची सजावट करीत असतो. त्यातून त्याची रसिकता,
सौंदर्यदृष्टी दिसून येते. असेच आगळे-वेगळे घर येवला शहरात पाहवयास
मिळते. ते घर आहे प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचे. या घराला
आगळे वेगळे म्हणण्याचे कारण असे की पंरपरेप्रमाणे त्यांनी आपल्या घराची
सजावट केली नसून जुन्या दुर्मिळ , कलात्मक वस्तुंचा संग्रह करुन त्या
आकर्षक पध्दतीने आपल्या घरातील दोन खोल्यातील भिंतीवर लाऊन एक छोटेखानी
वस्तुसंग्रहालयच तयार केलेले आहे.
हे संग्रहालय बघायला घरात प्रवेश करण्यापुर्वी बाहेरील भिंतीवर दरवाजाचे
दोन्ही बाजूस सुबक असे कोरीव काम केलेले पुरातन दगड आतील वेगळेपणाची
बाहेरच साक्ष देतात. घरात प्रवेश करताच दरवाजावरील नक्षीकाम अन् कडेला
चौकटी म्हणून लावलेल्या कोरीव नक्षीकामाकडे प्रथम नजर भिरभिरते. काही
वर्षांनी दिसणार नाही अशा चूल , वरवंटा-पाटा, खल, जातं यांच्या
प्रतिकृती ठेवल्या आहेत.नव्या पिढीला जुन्या वस्तुंची माहिती व्हावी या
हेतूने लाकडी वस्तू तर अप्रतिमच आहेत. घराच्या प्रवेश द्वाराच्या वरील
चौकटीवर दर्शनी गणेश व दोन्ही बाजूला रिध्दी सिध्दीची प्रतिकृती खोलवर
कोरुन तयार केली आहे. काही लाकडी कपाळपट्ट्यांवर मध्यभागी मंगलकलश ,तसेच
दोन्ही बाजूस लयबध्द नक्षीकाम केलेले आहे.हत्तीवर असलेल्या अंबारीत
बसलेला राजा हे काष्टशिल्प एका अखंड लाकडातून कोरलेले आहे, हे विशेष .
पुरातन काळातील लहान मुलांचा हातात फिरणारा लाकडी भोवरा, लाकडी पट्टीवरचे
अप्रतिम नक्षीकाम येथे आहेच.पण, विविध प्रकारचे कलात्मक अडकित्ते नजरेत
भरतात. या अडकित्त्यांवर घोडेस्वार,स्री-पुरष,आई-बाळ,वाघ, मोर यांचा
कौशल्यपुर्वक उपयोग केलेला दिसून येतो. अनेक कलात्मक पणत्यांचा येथे
संग्रह आहे. हत्तीला आपल्या पायाखाली दाबून धरणारा आकडेबाज मिशा असलेला
राजस्थानी शुरवीर,चिनी साधू एकाच लाकडी फळीतून कोरलेल्या वाद्य
वाजवीण्याऱ्या स्रिया,कांडण करणारी आफ्रिकन स्री,कलात्मक देव्हारा,घडी
होणारा पितळी ग्लास,अनेक काचेच्या हंड्या,विंचू,हत्ती यांच्या आकारातील
कुलुपा अशा अनेक वस्तू पाहून आपण थक्क होते, याशिवाय स्वतः कलाशिक्षक
म्हणूननिवृत्त झालेल्या व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या कल्पक दृष्टी
व कौशल्यातून साकारलेले मोराच्या पिसावरील टिळकांचे चित्र,कांद्याच्या
टरफलापासून बनविलेला ससा,कापडाच्या चिंध्यापासून बनवलेला फकिर,पोस्टाच्या
तिकिटापासून बनवलेली स्री,आंब्याच्या कोयीपासून बनवलेले
मासे-पोपट,शेंगाच्या टरफलापासून तयार केलेले शेतकरी,फुटक्या बांगड्या
पासून तयार केलेला आईटबाज कोंबडा इ. चित्रेही या संग्रहालयाचा रुबाब
वाढवतात.
अशा या संग्रहालयास राज्याचे बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच भेट देउन सर्व वस्तू बारकाईने पाहून
झळके सर यांचे कौतुक केले.कोणतेही प्रकारचे शुल्क न घेता येणाऱ्या
प्रत्येकास झळके सर या वस्तू दाखवतात.
थोडे नवीन जरा जुने