येवल्यात जबरी चोरी….. एकास जबर मारहाण करीत चार तोळे सोन्याचे दागिने व २५ हजारांची केली लुट

येवल्यात जबरी चोरी…..
एकास जबर मारहाण करीत चार तोळे सोन्याचे दागिने व २५ हजारांची केली लुट
येवला - वार्ताहर
येवला शहरातील नांदगाव रस्त्यावरील समदपार्क येथे शनिवारी पहाटे अडीचच्या दरम्यान जबरी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला . तीन चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडीत एकाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून चाकूचा दाखवीत चार तोळे सोन्याचे दागीने व २५ हजार रुपयांच्या आसपास रक्कम लुटुन नेली.
शहरातील समदपार्क परिसरात मोहंमद ईस्माईल हे कुटुंबींयासह झोपलेले असता शनिवारी पहाटे  अडीचच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा दर्शनी दरवाजाचा कडीकोंडा तोडीत घरात प्रवेश केला. झोपेतच असलेल्या मोहमंद ईस्माईल यांच्या डोक्यात लोखंडी सळईचा वार करीत त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून घरात काय आहे ते द्या असे म्हणत कपाटातून पंचवीस हजाराहून जास्त रोख रक्कम व चार तोळ्यांचे सोन्याचे दागीने लुटुन नेले. तीन चोरट्यापैकी एकजण बाहेर उभा होता तर इतर दोन चोरटे घरात मारहाण करीत होते. घटनेची माहिती मिळताच पोलसिांनी तपासाला सुरुवात केली असून ठसेतज्ञांना पाचारण करीत माहिती घेतली आहे. शहर पोलिस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक विश्वासराव निंबाळकर करीत आहेत. 

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चोरट्यांच्या या जबरी चोरीमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शहर पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांची संख्या कमी असतांनाच नाशिक येथील पोलिस भरतीसाठी काही पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी नाशिकला कार्यरत असल्याने अपुऱ्या पोलिस बळाअभावी शहर पोलिस ठाणे रिकामे रिकामे दिसत असून शहर पोलिस ठाण्याचा मुख्य कार्यभार असलेले पोलिस निरिक्षक हेही पोलिस भरतीच्या काळात रजा नाकारल्यामुळे आजारपणाच्या रजा घेऊन सुट्टीवर असल्याने येवलेकरांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.


थोडे नवीन जरा जुने