साई सच्चरित पारायण सोहळ्याचा शानदार समारोप

साईंचा सजीव देखावा, भगवे फेटे व नववारी साड्या परिधान केलेल्या महिला, गंगापूरच्या शिवराणा ग्रुपच्या ढोल पथकाने वेधले लक्ष

साई सच्चरित पारायण सोहळ्याचा शानदार समारोप

 येवला -वार्ताहर

गेल्या नऊ दिवसांपासून शहरातील नगरपालिका रस्त्यावरील जुन्या कोर्ट मैदानात श्री साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने आयोजित महापारायण सोहळ्याचा शनिवारी शानदार समारोप झाला. साईबाबांचा सजीव देखावा, भगवे फेटे व नववारी साड्या परिधान केलेल्या महिला व गंगापूरच्या शिवराणा ग्रुपच्या ढोल पथकाने साई पालखीच्या मिरवणुकित संपूर्ण येवलेकरांचे लक्ष वेधले. 
गुढी पाडव्याचे शुभ मुहूर्तावर सालाबादप्रमाणे यंदाही श्री साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने आयोजित साई सच्चरित पारायण सोहळा यावर्षी लक्षवेधी ठरला. पारायण सोहळ्याचे यंदा सलग सातवे वर्ष असून सोहळ्यात एकूण ३७१ पारायणार्थींनी सहभाग नोंदविला होता. यात ३१० महिला तर ६१ पुरुषांचा समावेश होता. संपूर्ण नऊ दिवस पारायणात कथांचे निरुपण ह. भ. प. अनिल महाराज जमधडे यांनी केले. शनिवारी पारायण सोहळ्याचा समारोप झाला. समारोपानिमित्ताने सकाळी ११ वाजता पालिका रस्त्यावरील जुन्या कोर्ट मैदानावरुन साई पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली. गंगापूरच्या शिवराणा ग्रुपचे ढोल पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. साई बाबांच्या सजीव देखाव्यात बाबांची भुमिका प्रमोद आवणकर, तात्या पाटलांची भुमिका अक्षय राजगुरु, तर अब्दुल बाबांची भुमिका वैभव साबळे यांनी हुबेहूब रेखाटली होती. श्री साई सेवा भक्त परिवाराचे संस्थापक बिरजु राजपुत यांनी सहभागी साई भक्तांचे मिरवणुकीत स्वागत केले. अध्यक्ष श्रीकांत खंदारे यांनी शिवराणा ग्रुपच्या ढोल पथकातील युवकांना व साई भक्त महिलांना भगवे फेटे यावेळी बांधले. साई पालखीची मिरवणुक शहरातील आझाद चौक, राणा प्रताप चौक, काळा मारुती रोड, पटणी गल्ली, जब्रेश्‍वर खुंट, मेन रोड, खांबेकर खुंट, थिएटर रोड या मार्गावरुन नेण्यात आली. ठिकठिकाणी शहरवासीयांनी साई पालखीच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. तर महिलांनी घरांसमोर रांगोळ्या काढून स्वागत केले. मिरवणुकीचा समारोप दुपारी २ वाजता पारायण स्थळी करण्यात आला. या नंतर ह. भ. प. सुवर्णाताई जमधडे यांचे काल्याचे किर्तन झाले. किर्तनानंतर साई भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी बिरजु राजपुत, श्रीकांत खंदारे, संतोष गुंजाळ, निरंजन रासकर, दिगंबर गुंजाळ, अनिल माळी, मनोज मडके, भुर्‍या रासकर, ज्ञानेश्‍वर जगताप, बन्टी भावसार, सुनील हिरे, राम रासकर, शंकर परदेशी, पप्पू गुंजाळ, श्रीकांत हिरे, भुषण हिरे आदींसह श्री साई सेवा भक्त परिवाराचे सर्व सन्मानिय सदस्य प्रयत्नशील होते. रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता यंदाही शिर्डी येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक बिरजु राजपुत यांनी दिली आहे.
थोडे नवीन जरा जुने