स्वप्न पहा अन पूर्ण करण्यासाठी सकारात्मक रहा! अविनाश पाटील : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विध्यार्थी मेळावा

स्वप्न पहा अन पूर्ण करण्यासाठी सकारात्मक रहा!
अविनाश पाटील : एसएनडी  अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विध्यार्थी मेळावा


येवला : पुढारी वृत्तसेवा

युवकांनी विद्यार्थी दशेतच स्वप्न पहा,ध्येयाने कार्यरत रहा.आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाची सकारात्मक विचाराने सुरुवात करा.तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळण्यासाठी सकारात्मक गोष्टीवरच लक्ष्य केंद्रित करा.सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या सहवासात रहा.या छोट्या गोष्टी तुमच्यामध्ये नक्कीच मोठे सकारात्मक विचार रुजवतील अन तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतील असे प्रतिपादन नाशिक येथील बीएसएनएलचे सहाय्यक महाव्यवस्थापक अविनाश पाटील यांनी केले.
बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये आयोजित माजी विध्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी श्री.पाटील तसेच जगदंबा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मण दराडे, प्राचार्य डॉ.डी.एम.यादव आदींच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी व आजचे अभियंते महाविद्यालयाच्या आठवणीत हरवून गेले होते.ग्रामीण भागातील महाविद्यालय असूनही या महाविद्यालयाने खूप काही दिले व आयुष्यात उभेही केले अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ,  काम,आरोग्य,तणाव तसेच चांगले संबंध हे पाच व्यवस्थापन तंत्र आत्मसात करा असा सल्ला श्री.पाटील यांनी दिला.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे संस्थेचे व महाविद्यालयाचे भूषण असतात. त्यांच्या प्रगतीतच महाविद्यालयाचे समाधान व आनंद भरलेला असतो असे सांगून माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करून नावलौकिक मिळवावा असे संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मण दराडे म्हणाले.
प्राचार्य डॉ.डी.एम.यादव  म्हणाले की, महाविद्यालयाच्या जडणघडीत तसेच वाटचालीत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे.महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत विविध चांगले उपक्रम राबवावे असे आव्हान प्राचार्यां यादव यांनी केले.माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची ओळख करून दिली व विविध उध्दिष्टये सांगितले.२०१० पासूनचे १०० हुन अधिक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महविद्यालया वरील आपले प्रेम व्यक्त केले.अमोल बर्डे,संजना बाबर,गायत्री दिघे,शशिकांत दुगड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाने आमच्या आयुष्यात मोठे योगदान दिल्याने आजचा आनंददायी दिवस पाहू शकत असल्याचे सांगितले.
स्थापत्य विभागप्रमुख डॉ.यू.एस.अन्सारी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. हरजीत पवार,विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी अरविंद घोडके,खजिनदार दत्तात्रय क्षीरसागर,
जयंत केंगे,शुभम शिंदे,संगणक विभागप्रमुख डॉ.उमेश पवार,एमबीए विभागप्रमुख डॉ.व्ही.एन.उबाळे,माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा.पी.पी.रोकडे, ईलेकट्रीकल विभाग प्रमुख डॉ.पी.सी. टापरे आदी प्राध्यापक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.एन.जी.गवळी यांनी.आभार मानले.सूत्रसंचालन डॉ. स्वप्नाली तांबे यांनी केले. 
फोटो
बाभूळगाव : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे दीपप्रज्वलन करताना अविनाश पाटील, लक्ष्मण दराडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात माझी विद्यार्थी व प्राध्यापक.
थोडे नवीन जरा जुने