भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
येवला :- पुढारी वृत्तसेवा
अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची प्रेरणा श्रीकृष्णाने दिली आहे. भगवत गीतेत याबद्दल सर्व वर्णन करण्यात आले आहे. नातं बाजूला ठेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी त्यांनी अर्जुनासह पांडवांची साथ दिली. श्रीकृष्णाची हीच शिकवण व उपदेश समाजाने सद्य परिस्थितीत अंगिकारायला हवी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अंदरसुल बनकर वस्ती येथे श्री कृष्ण मंदिराचे लोकार्पण व कलशरोहन समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री.राजधरबाबा महानुभाव, श्री कानळसकर बाबा, श्री सुकेणकरबाबा भागवताचार्य, श्री.चिरडे बाबा, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, नंदलाल बनकर, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, आयोजक चंद्रकांत बनकर, आबासाहेब बनकर, तात्यासाहेब बनकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, भगवान श्रीकष्णांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जी शिकवण दिली. ती समाजातील सर्व घटकांनी अंगिकारावी लागेल तेव्हाच समाजव्यवस्था सुस्थितीत राहील. त्यासाठी तुम्हाला आम्हाला योग्य ठिकाणी अर्जुन बनण्याची गरज आहे. एकत्रित राहिलात तर अन्यायाविरुद्ध आपण लढा देऊ शकतो विखुरले गेलो तर अन्याय सहन करावा लागेल. त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहून काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अतिशय सुबक असे श्रीकृष्णाचे मंदिर तयार करण्यात आले. याठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी लवकरच सभामंडप उभारण्यात येईल तसेच आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.