बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये महापुरुषांना अभिवादन करत रक्षाबंधन उत्साहात साजरा
विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळख असलेल्या बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला घट्ट बांधणारा रक्षाबंधन हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध भारतीय सण हे भारतीय परंपरा व संस्कारांचे प्रतिक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांचे संस्कारही महत्वाचे असतात. हाच उदात्त हेतू समोर ठेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य पंकज निकम यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये रक्षाबंधण निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. शिव-शाहू, फुले,आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.
'इडा पिडा जाऊदे बळीचे राज्य येऊ दे' असा बलशाली नितीवान भाऊ प्रत्येक स्त्रीला हवाय पण रक्षाबंधनाच्या औचित्य साधून स्री सन्मान शिकवणाऱ्या शिव-शाहू, फुले,आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करत आगळे-वेगळा रक्षाबंधन कार्यक्रम बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झाला.प्रत्येक स्त्रीला बहिण –माता म्हणून सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांनी स्त्रीयांना दिलेले सामाजिक –शैक्षणिक स्वातंत्र्य,महात्मा फुलेंची स्त्री शिक्षणाची क्रांती ,तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री सक्षमीकरण बाबत धोरणे याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.एक आगळे-वेगळे रक्षाबंधन यावेळी या महामानवांचे स्मरण करून करण्यात आले.
यामध्ये पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन संबंधी चित्र रंगविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थांनी आपल्या मनातील राखी कागदावर उतरवण रंगकामाची अदाकारी दाखविली. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचे साहित्य उपलब्ध करून देत राखी बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक राख्या बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच बहिणीसाठी आभार मानणारे शुभेच्छा पत्र ही काही विद्यार्थ्यांनी तयार केले. शाळेचे कलाशिक्षक निखील जाधव यांनी भव्य अशी प्रातिनिधिक राखी बनवत विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही भव्य राखी सजावट आकर्षण ठरली.
तसेच शाळेतील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थीनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना व गुरुजनांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सणाचा उत्साह वाढविला. इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील झाडांना राखी बांधत पर्यावरण संवर्धनाचा निश्चय केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना चॉकलेट व भेट वस्तू देत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य पंकज निकम यांनी संकुलातर्फे सर्वांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे समन्वयिका रुपाली चव्हाण, समन्वयक दीपक देशमुख, सांकृतिक विभाग प्रमुख प्रियांका पटेल, योगिता शिंदे, दिपाली जाधव, वृषाली पानगव्हाणे, नेहा सोनार, स्वप्नाली गंगापूरकर, शिवाजी झांबरे, सागर सोनावणे, विकास मोरे, प्रशांत तात्पुरकर, प्रियांका कासले, अनिता शिंदे, जयश्री लोंढे, अर्चना खराटे, कोमल निघोटे, सारिका उंडे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“भारतीय सण-उत्सव साजरे करताना विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक –सांकृतिक जाणिवांची रुजवण व्हावी हा हेतू समोर ठेऊन विविध उपक्रम बनकर पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित केले जातात. परंपरा जपत असतानाच आपण सामाजिक, ऐतिहासिक महत्व जपले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपले सण-उत्सवांमागे महापुरुषांचा संघर्ष व भूमिका , योगदान याची माहिती मिळावी या उद्देशाने असे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. .
.....प्रवीण बनकर , अध्यक्ष , बनकर पाटील शैक्षणिक संकुल. ”