६५ वर्षाच्या महिलेस मारहाण करून अज्ञात चोरटय़ांनी लांबवले 74 हजार

येवला  - प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या महिलेस चार अज्ञात चोरटय़ांनी मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, चांदीचे जोडवे, दहा हजार रुपये रोख असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज लुटून तिला नाशिक-शिर्डी रोडवर सोडून पलायन केले, अशी फिर्याद नानुबाई विनायक कांबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

शनिवारी दुपारी 12.30च्या सुमारास नानुबाई विनायक कांबळे (वय 65, रा. रहाडी, ता. येवला) ही महिला येवला रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी फत्ते बुरुज नाक्यावर उभी होती. तेवढय़ात मनमाडहून कोपरगावकडे जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या इंडिका कारमध्ये ही महिला रेल्वे स्टेशनकडे जाण्यास बसली; मात्र रेल्वे स्टेशनजवळ या महिलेस कारमधून उतरू न देता कारमधील तीन पुरुष व एका महिलेने नानुबाई कांबळे हीस दाबून धरत मारहाण केली व तिची मान पिरगळण्याचा प्रयत्न करत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत 60 हजार रुपये किंमतीची चार हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे, दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज लुटून तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड जबरीने काढून तिला वावी (ता. सिन्नर), नाशिक-शिर्डी रोडवर सोडून कारसह सिन्नरकडे पलायन केले. या महिलेने वावी पोलीस ठाणे गाठले; मात्र घटना येवला शहर पोलीस हद्दीत घडल्याने वावी पोलिसांनी महिलेस येवला शहर पोलीस ठाण्यात आणले असून, याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. उप.नि.खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने