मांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश

मांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा...

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश...

मांजरपाडा प्रकल्पाच्या निधी खर्चास राज्य शासनाची मंजुरी

 

येवला : - वार्ताहर

छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता तातडीने सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासाठी छगन भुजबळ यांचा आर्थर रोड तुरुंगातून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार आज मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधीच्या खर्चास राज्य शासनाने आज मंजुरी दिल्याची माहिती भुजबळांचे स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

 

सिंचन विषयक  विशेष चौकशी समितीच्या अहवालात ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प म्हणजेच मांजरपाडा (ता.सुरगाणा, जि.नाशिक) वळण योजनेचा समावेश होता. सदर समितीच्या अहवालावरील शासनाचा कार्यपालन अहवाल मुद्दा क्र.९.४.५ च्या अनुषंगाने राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांनी दि.१९.१२.२०१५ रोजी शासनास अहवाल सादर केला होता. त्यावर शासनाने दि.६ जानेवारी २०१६ च्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या शेऱ्याचा पूर्तता अहवाल गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद कडून दि.१४ मार्च २०१६ रोजी शासनास सादर झालेला होता. त्यावर दि.१२ मे २०१६ च्या शासनाच्या पत्रान्वये मांजरपाडा योजनेच्या टेक्निकल ऑडीट संदर्भात नेमण्यात आलेल्या द्विसदस्यीय  समितीने दि. २४ मे २०१६ रोजी सदर प्रकल्प स्थळाची व कार्यक्षेत्राची पाहणी करून शासनास अहवाल सादर केलेला होता.

            सद्यस्थितीत ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ८६ % तर धरण आणि सांडव्याचे ६०% काम पूर्ण करण्यात आलेले आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे अडवून हे पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेस लवकरत लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता किंवा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येऊन या योजनेचे काम सुरु करावे अशी भुजबळ यांची मागणी होती.

 

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे मांजरपाडा या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी आडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्यस्थितित ८.९६ की मी लांबीच्या बोगद्यापैकी ९० टक्के आणि ३.२० किमी लांबिच्या  उघड्या चराचे पूर्ण काम झाले आहे. तर धरणाचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितिकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश असल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम ऑक्टो २०१४ पासून बंद पडले होते. विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकल्पसाठी ७० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला होता मात्र सत्तापरिवर्तनंमुळे हे काम रखडले होते. मागील वर्षी शासनाने ७० कोटींपैकी सुमारे ४० कोटी निधी राज्यातील दुसऱ्या प्रकल्पांसाठी वर्ग केला होता. सध्यस्थितित या प्रकल्पसाठी ३३ कोटी निधि शिल्लक असुन दि.१८ मार्च रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उर्ध्व गोदावरीसाठी ३८.३५ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी भुजबळांचा विधिमंडळात सतत पाठपुरावा सुरु होता. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात मा. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना या योजनेचे काम तातडीने सुरु केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वाशन दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. केवळ बोगदयाचे काम जरी पूर्ण झाले तरी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेसाठी भुजबळांचा  पाठपुरावा सुरु होता. याबाबत छगन भुजबळ यांनी यापूर्वी आर्थर रोड कारागृहामधुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र सुद्धा लिहिले होते.  आता राज्य शासनाने शिल्लक असलेल्या ३३ कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी दिल्यामुळे लवकरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. येवला तलुक्यासह दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने