नारायनगिरी महाराज फाउंडेशनने उचलला उपचाराचा खर्च
आगीत भाजलेल्या सुल्याबाई वाघ यांना मिळणार जीवदान
येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथील सुल्याबाई दत्तू वाघ यांचे जळीत झाल्याने त्यांना उपचाराचा खर्च भागवणे अशक्य झाल्याचे समजताच नारायनगिरी महाराज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विष्णुशेठ भागवत व येवला पंचायत समितीचे उपसभापती ,येवला लासलगाव विधानसभा शिवशेनेचे संघटक रुपचंद भागवत या बंधूंनी या रुग्णाचा उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला असून यामुळे या गरीब महिलेला जीवदान मिळणार आहे.
गोपाळवाडी येथील सुल्याबाई दत्तू वाघ ही महिला भाजल्याने तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे ही महिला दोन महिने उपचारासाठी थांबली होती. मात्र पुरेसे व वेळेवर उपचार होत नसल्याने या महिलेच्या आईने येवला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हाती असलेला व नातेवाईकांकडून जमा केलेला पैसा संपल्यावर घरी असलेल्या स्व मालकीच्या सर्व बकऱ्या विकून उपचार सुरू ठेवले. रुग्णाला व रुग्णाचे व रुग्णालच्या आईचे पोट भरण्यासाठी दवाखान्याच्या परिसरातून भीक मागून पोट भरावे लागत आहे. उपचारासाठी जमवलेला पैसा संपल्याने डॉक्टरने उपचारासाठी अनामत रक्कम भरा, अथवा पेशंट घरी घेऊन जा, असे सांगितल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही बाब येथे उपचारासाठी दाखल असलेले पुरणगावचे माजी सरपंच रावसाहेब ठोंबरे यांनी भागवत बंधूंच्या कानावर घातली. भागवत बंधूंनी तत्काळ आपला प्रतिनिधी एकनाथ भालेराव यांना दवाखान्यात पाठवून माहिती घेतली. रुग्ण बरा होईपर्यंत त्याच्यावर संपूर्ण उत्तमोत्तम उपचार करण्याचे व सर्व बिल नारायनगिरी महाराज फाउंडेशन भरणार असल्याचे सांगितले. रुग्णालच्या व सोबत असलेल्या आईच्या दोन वेळच्या जेवणाच्या डब्याचीही व्यवस्था भागवत बंधूंनी केल्याने रुग्णाच्या नातेवाईनकांच्या डोळ्यात आसवे चमकत होती.