येवल्यातील सरपंच महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा.... जऊळके गावच्या सरपंचपदी ज्योती खैरणारच. उच्च न्यायालयाचा आदेश.

येवल्यातील सरपंच महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा....

जऊळके गावच्या सरपंचपदी ज्योती खैरणारच.
उच्च न्यायालयाचा आदेश. 


येवला :  पुढारी वृत्तसेवा

जऊळके ता. येवला या गावच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी 2019 साली थेट जनतेतून निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत येथील ज्योती प्रभाकर खैरनार या जनतेतून निवडून येऊन सरपंचपदी नियुक्त झाल्या होत्या. मात्र सप्टेंबर 2021 मध्ये ग्रामपंचायतीचे दुसरे सदस्य चांगदेव खंडेराव जाधव यांनी व सदस्या मनीषा संतोष खैरनार यांचे पती संतोष कारभारी खैरनार यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच श्रीम. ज्योती खैरनार यांनी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार करुन आपल्या पतीच्या नावे वेगवेगळ्या चेक्सद्वारे एकूण रु. 12584/- एवढी रक्कम काढून सरपंच पदाचा गैरवापर करीत आपल्या पतीला फायदा मिळवून दिला आहे असा आरोप करीत त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे म्हणून तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज जिल्हाधिकारी यांनी मान्य करीत दि.19/10/2022 रोजी ज्योती खैरनार यांचे सदस्यत्व व सरपंच पद रद्द केले होते. त्यानंतर ज्योती खैरनार यांनी अप्पर आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. अप्पर आयुक्त यांनी दि. 19/05/2023 रोजी सदर अपील फेटाळून लावत जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम केला होता. 
सदर दोन्ही निर्णयांना श्रीम. ज्योती खैरनार यांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. एकनाथ ढोकळे यांच्यातर्फे याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. सदर याचिकेवर आज रोजी मा. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सदर सुनावणी दरम्यान ऍड. एकनाथ ढोकळे यांनी यक्तिवाद करतांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की जी काही रक्कम ज्योती खैरनार यांचे पतीला देण्यात आली होती ती दि. 07/04/2020 रोजी ग्रामपंचायतीने पारित केलेल्या ठरावानुसारच देण्यात आली होती. सदर ठरावावर सदस्य म्हणून तक्रारदार यांनी त्यावेळी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता. शिवाय ज्योती खैरनार यांच्या पतीने लॉक डाऊन च्या काळात ग्रामपंचायतीत जी कामे होणे अत्यावश्यक होते ती व्हावी म्हणून स्वतःच्या खिशातून जो खर्च केला होता त्या बदल्यात त्यांना ती देण्यात आली होती. ही बाब सोडता ज्योती खैरनार किंवा त्यांचे पती यांचा ग्रामपंचायतीने केलेल्या कामामध्ये कोणताही भाग अथवा हितसंबंध नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांनी दिलेले आदेश हे केवळ अन्यायकारकच नाही तर कायद्यासमोर टिकणारे देखील नाहीत असा युक्तिवाद ऍड. ढोकळे यांनी केला. सदर युक्तिवाद मान्य करीत व मुख्य म्हणजे ज्योती खैरनार यांच्या पतीला रक्कम देण्याबाबत झालेल्या ठरवावावेळी तक्रारदार यांनी कोणतीही हरकत घेतलेली नाही ही बाब विचारात घेता सदरचे दोन्ही आदेश कायद्यासमोर टिकाव धरणारे नाहीत असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले व वरील दोन्ही आदेश रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ज्योती खैरनार यांना मोठा दिलासा मिळाला असून  जऊळके गावच्या सरपंचपदी पुन्हा एकदा विराजमान होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने