येवला तालुक्यात विमानाचा थरार; दिल्ली-शिर्डी विमान हवेत भरकटले, अखेर सुरतमध्ये सुरक्षित लँडिंग
येवला
सोमवारी सायंकाळी येवला तालुक्याच्या पूर्व भागात एका विमानाने अतिशय कमी उंचीवरून मारलेल्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेले हे विमान खराब हवामानामुळे भरकटल्याने हा सर्व प्रकार घडला. मात्र, अखेर या विमानाचे सुरत विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान सोमवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास शिर्डी विमानतळावर लँड होणार होते. मात्र, शिर्डी परिसरात विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि पावसाची भयानक परिस्थिती असल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) लँडिंगसाठी परवानगी नाकारली. यामुळे विमान हवेतच 'होल्ड'वर असताना चुकून येवला तालुक्याच्या हवाई हद्दीत आले.
गावागावांत भीतीचे वातावरण
हे विमान येवला तालुक्यातील भारम, गारखेडा, आडसुरेगाव आणि पिंपळखुटे बुद्रुक या गावांच्या आकाशात अतिशय कमी उंचीवरून ६ ते ८ वेळा गोलाकार घिरट्या घालत होते. रात्रीच्या वेळी विमानाचा मोठा आवाज आणि कमी उंची यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. यामुळे ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले होते.
प्रशासनाची धावपळ आणि ATC कडून स्पष्टीकरण
नागरिकांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणेला फोन केल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे आणि तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तात्काळ शिर्डी आणि नाशिक एटीसीशी संपर्क साधला. दरम्यान, काही नागरिकांनी औरंगाबाद एटीसीशी संपर्क साधला असता, शिर्डीतील खराब हवामानामुळे विमान या भागात घिरट्या घालत असल्याचे सांगण्यात आले.
सुरतमध्ये सुरक्षित लँडिंग
बराच वेळ हवेत राहिल्यानंतर आणि शिर्डीतील हवामानात सुधारणा होत नसल्याने, वैमानिकाने विमानाची दिशा वळवली. अखेर या विमानाचे सुरत विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित असल्याची माहिती मिळताच प्रवाशांच्या नातेवाईकांसह येवला तालुक्यातील नागरिकांमधील चिंतेचे सावट दूर झाले.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री पावणे आठ ते आठच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. हवामान खराब असल्यानेच विमान या भागात फिरत होते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
