वीर सावरकर जयंतीनिमित्त येवल्यात 'रक्तदान यज्ञ' : ९० हून अधिक दात्यांनी केले 'महादान'
अतिउष्णतेवर दात्यांचा उत्साह भारी; आनंद शिंदे आणि देवीदास भामारे यांनी सपत्नीक केले रक्तदान
येवला :
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून येवला शहरात आयोजित करण्यात आलेले 'भव्य रक्तदान शिबीर' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मे महिन्यातील कमालीचा उन्हाचा कडाका आणि अतिउष्णतेचे वातावरण असूनही सावरकरप्रेमी नागरिक आणि तरुणांचा उत्साह दांडगा होता. या शिबिरामध्ये ९० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत 'महादान' केले.
शिबिराची वेळ संपली, पण उत्साह संपेना!
वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, येवला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण रक्तपेढी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी गल्लीतील 'यशोधन' (येवला मर्चंट बँक) येथील प.पु.डॉ.हेडगेवार सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजल्यापासूनच रक्तदात्यांनी सभागृहात गर्दी केली होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या शिबिराची अधिकृत वेळ होती; मात्र कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद व उत्साह पाहता संध्याकाळी ६ वाचेनंतरही हा 'रक्तदान यज्ञ' सुरूच होता.
आदर्श जोडीदारांचे सपत्नीक रक्तदान
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या जीवनसाथीसह एकत्र येत केलेले रक्तदान ठरले. भाजपचे नाशिक उत्तर जिल्हा महामंत्री तथा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी आपली पत्नी सौ. सविता शिंदे यांच्यासह जोडीने रक्तदान केले. तर येवला शहरातील प्रसिद्ध व्यापारी देवीदास भामारे यांनीही आपल्या पत्नीसह या रक्तदान यज्ञात सहभाग नोंदवला. या दांपत्यांनी सपत्नीक रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
सावरकरप्रेमींचा मोठा सहभाग
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी येवला परिसरातील सावरकरप्रेमी नागरिकांनी व तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संपूर्ण परिसरात देशप्रेमाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
