डॉक्टर्स डे निमित्त येवला पांजरपोळ येथील ‘देवराई’ प्रकल्पाचा वाढदिवस साजरा; शतप्रतिशत पूर्ततेसाठी वृक्षारोपणाचा नवा संकल्प

 डॉक्टर्स डे निमित्त येवला पांजरपोळ येथील ‘देवराई’ प्रकल्पाचा वाढदिवस साजरा; शतप्रतिशत पूर्ततेसाठी वृक्षारोपणाचा नवा संकल्प


येवला :  



'डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून येवला तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन (YTMPA) आणि येवला डॉक्टर्स पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने एक अनोखा व कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. जुलै २०२३ मध्ये संस्थेचे तत्कालीन उपक्रमशील अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या संकल्पनेतून आणि सर्व डॉक्टरांच्या प्रत्यक्ष श्रमदानातून व आर्थिक सहकार्यातून गौशाळा पांजरपोळ येथे ‘देवराई प्रकल्प’ साकारण्यात आला होता. या प्रकल्पातील ३०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या वृक्षांचा वाढदिवस डॉक्टर्स डे निमित्त साजरा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


८० टक्के झाडे जगवण्यात यश, फळे व बिया मिळण्यास सुरुवात....


गेल्या तीन वर्षांत विविध नैसर्गिक आपदांचा सामना करत संस्थेने जवळपास ८० टक्के झाडे यशस्वीपणे वाचवून मोठी केली आहेत. आज ही सर्व झाडे किमान १० फुटांपेक्षा जास्त उंचीची झाली असून, यातील अनेक झाडांपासून फळे व पुढील लागवडीसाठी बिया मिळण्यासही सुरुवात झाली आहे, ही येवला परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.


‘देवराई’ १०० टक्के पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांचे योगदान....


वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. राम खोकले यांनी या वाढदिवसाचे नियोजन केले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत येवला तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार साळुंके यांनी देवराईतील मोकळ्या जागेत किमान १२ ते १५ फूट उंचीची मोठी झाडे लावून हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत असोसिएशनचे खजिनदार डॉ. सुजित एलमामे यांनी रूपये ४,३०० मूल्याचे ‘ऑर्टोकार्पस लकुचा’ (लकूच) हे दुर्मिळ रोप, तर निमा येवला शाखेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. जयप्रकाश करवा यांनी रुपये ३,२०० किमतीचे ‘पायरॉस्पर्मम सुबेरिफोलियम’ (दक्षिण मुचकुंद) या प्रजातीचे रोप लागवडीसाठी वैयक्तिक स्वरूपात भेट दिले.


डॉक्टरांच्या नावाने डोलताहेत वृक्ष....


आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या वृक्षसंवर्धन कार्यात निरपेक्ष मदत केली, त्या प्रत्येकाच्या नावाने किमान २ झाडे आज येवल्याच्या पर्यावरण क्षेत्रात मोलाची भर घालत आहेत. यामध्ये डॉ. बंब यांचा ‘मोह वृक्ष’, डॉ. तुसे यांचे ‘सीतारंजन’, डॉ. झिनत  यांची ‘शाल्मली वृक्ष जोडी’, आणि डॉ. कविता  यांनी दिलेले विविध प्रकारचे ‘वटवृक्ष’ दिमाखात डोलत आहेत. सर्व सदस्यांनी वर्षातून किमान एकदा आपल्या नावाने लावलेल्या या झाडांची पाहणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


बिजसंकलन व वृक्षारोपणाची अखंड मोहीम...


आजच्या या विशेष वृक्षलागवड मोहिमेसाठी उपाध्यक्ष डॉ. राहुल कदम, सेक्रेटरी डॉ. योगेश जेजुरकर, खजिनदार डॉ. धनराज काटे, तसेच निमा येवला प्रमुख डॉ. अमोल पहिलवान आणि डॉ. रोहन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. शिल्पेश माळी आणि डॉ. घनश्याम सोनार यांनीही मोलाचे सहकार्य केले.

येवला डॉक्टर्स पर्यावरण संवर्धन संस्थेचे डॉ. अविनाश विंचू यांनी माहिती दिली की, उद्यापासून रोज सकाळी किमान ५ वृक्षांचे रोपण आणि बिजसंकलनाचा उपक्रम सातत्याने राबवला जाणार आहे. येवला परिसराला हरित व प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि निसर्गाप्रेमींनी या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने